IND W vs ZIM W : कॅप्टन्सी जाताच हरमनप्रीत तळपली, 15 महिन्यांनी लगावलं शतक, मैदानात धावांचा पाऊस, ‘या’ दिग्गजाचा रेकॉर्ड मोडीत
Harmanpreet Kaur Century : भारतीय महिला संघाची माजी कर्णधार हरमनप्रीत कौर हिने झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत शतक झळकावत दमदार पुनरागमन केलं आहे. तिने वादळी शतक झळकावलं आहे.

झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या महिला वनडे सामन्यात हरमनप्रीत कौरने 121 चेंडूंत 126 धावांची खेळी केली. या खेळीत तिने 15 चौकार मारले आणि वनडे कारकिर्दीतील आठवे शतक झळकावले आहे.
या शतकासह हरमनप्रीतने मिताली राजला मागे टाकले आहे. भारतीय महिला क्रिकेटमध्ये वनडे सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजांमध्ये ती आता दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर स्मृती मानधना 14 शतकांसह पहिल्या क्रमांकावर आहे.
भारताची सुरुवात खराब झाली होती. स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा लवकर बाद झाल्यामुळे भारताची अवस्था 19 धावांत 2 विकेट्स अशी झाली होती. त्यानंतर हरमनप्रीतने प्रतिका रावलसोबत 124 धावांची भागीदारी करत डाव सावरला.
हरमनप्रीतनंतर दीप्ती शर्मानेही शतक झळकावले. तिने 86 चेंडूंत नाबाद 106 धावा केल्या. वनडे क्रिकेटमध्ये सहाव्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करत शतक झळकावणारी ती पहिली भारतीय महिला ठरली.
हरमनप्रीत आणि दीप्ती यांनी पाचव्या विकेटसाठी 153 धावांची भागीदारी केली. भारतीय महिला वनडे क्रिकेटमध्ये पाचव्या किंवा त्यापेक्षा खालच्या विकेटसाठी झालेली ही सर्वात मोठी भागीदारी ठरली. या दोघींच्या शतकांमुळे भारताने 50 षटकांत 6 बाद 328 धावा केल्या.