
आई-वडिलांच्या डोळ्याचं ऑपरेशन करण्याची जिद्द मनाशी बाळगून ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये सहभागी झालेल्या लातूरच्या अस्मिता माधव गोरेने 12 लाख 50 हजार रुपये जिंकले आहेत.

लातूरमध्ये राहणारी अस्मिता माधव गोरे वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी केबीसीच्या खुर्चीत विराजमान झाली होती.

अस्मिताचे वडील अंध असून, आईदेखील एकाच डोळ्याने पाहू शकते. अस्मिताच्या प्रगतीबद्दल तिची आई, वडिलांना सगळ्या गोष्टी सांगते. जणू काही तिचे वडील आईच्या एका डोळ्यातूनच अस्मिताला पाहतात.

अस्मिताला विदेशात जाऊन तिच्या आई-वडिलांची दृष्टी परत यावी म्हणून शस्त्रक्रिया करायची आहे. आई-वडिलांना आपण कसे दिसतो, काय करतो हे स्वतःच्या डोळ्यांनी पाहता यावे, म्हणून अस्मिताची धडपड सुरू आहे.

नेत्रहीन असलेले आई-वडील कायमच लेकीच्या मागे भक्कम आधार बनून उभे राहिले आहेत. केबीसी मंचावरदेखील ते अस्मितासोबत उपस्थित होते.

अमिताभ बच्चन यांनी अस्मिताला सलाम करत, तिच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. केबीसीच्या मानाच्या खुर्चीत विराजमान झालेली ही महाराष्ट्राची लेक अवघ्या देशासाठी प्रेरणादायी ठरली आहे.