
आयपीएल 2021 चा चौथा सामना सोमवारी म्हणजेच आज राजस्थान रॉयल्स (Rajsthan Royals) विरुद्ध पंजाब किंग्ज (Punjab Kings) यांच्यात खेळला जाणार आहे. या सामन्यासह दोन्ही संघ आयपीएलच्या 14 व्या पर्वातील (IPL 2021) प्रवासाला सुरुवात करतील. याअगोदर 21 वेळा हे दोन्ही संघ आमने सामने आले आहेत. आज 22 व्या वेळी हे दोन्ही संघ एकमेकांसमोर उभे ठाकतील.

आयपीएलमध्ये आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 21 सामन्यात राजस्थान रॉयल्सने 12 वेळा विजय मिळविला तर 9 वेळा पंजाब किंग्जने राजस्थानला पराभूत केलंय.

भारतीय मैदानावर दोन्ही संघांमध्ये 16 सामने खेळले गेले. येथेही राजस्थानने बाजी मारत 9 सामने जिंकले. पंजाबने 7 सामन्यात बाजी मारली आहे.

राजस्थान रॉयल्सकडून पंजाब किंग्जविरोधात सर्वाधिक 406 धावा करणारा फलंदाज कर्णधार संजू सॅमसन आहे तर बेन स्टोक्स 6 विकेट्स घेऊन पहिल्या क्रमांकावर आहे.

तर पंजाब किंग्जकडून राजस्थानविरोधात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज कर्णधार केएल राहुल आहे. त्याने आतापर्यंत 350 रन्स केले आहेत. तर मोहम्मद शमीने आतापर्यंत राजस्थानच्या 5 विकेट्स मिळवल्या आहेत.

झेल घेण्याच्या बाबतीतही दोन्ही संघांचे कर्णधार एकमेकांच्या जवळपास आहेत. संजू सॅमसनने 8 कॅच पकडले आहेत तर केएल राहुलने 5 कॅच पकडले आहेत.