
काल 12 दिवसांच्या संघर्षानंतर इस्त्रायल आणि इराण यांनी शस्त्रसंधी केली. युद्ध विरामावर दोन्ही देश राजी झाले. अनेक देशातील शेअर बाजार तेजीत आले तर सोने-चांदीतील गुंतवणूक कमी झाली. दोन्ही धातुचे भाव उतरले आहेत.

जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. दोन्ही धातुने अक्षरशः लोटांगण घेतले आहे. किंमती कमी झाल्याने ग्राहकांची पावले बाजाराकडे वळली आहे. सराफा बाजारात खासा गर्दी दिसत आहे.

सोन्याचे दर २ हजार रुपये तर चांदीचे दर १ हजाराने घसरले आहेत. जळगाव सराफा बाजारात सोने जीएसटीसह १ लाख ३२२ रुपये तोळा तर चांदी १ लाख ०९ हजार १८० रुपये किलोवर आली आहे.

सोन्याने चांदीच्या दरात घसरण झाल्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्या खिशावरील ताण कमी झाला आहे. या वर्षी सोन्याचा तोरा वाढला आहे. सोन्याने लाखाचा उंबराठा ओलांडल्याने अनेक ग्राहकांनी सराफा बाजाराची वेस काही ओलांडली नाही. पण भाव कमी झाल्यावर ग्राहक खरेदीसाठी येत असल्याचे चित्र आहे.

इस्रायल - इराण युद्धबंदीच्या घोषणेने सोन्या आणि चांदीचे दर घसरल्याची माहिती सराफ व्यावसायिकांनी दिली आहे. युद्धानंतरचे धोरण निश्चित झाल्यानंतर आणखी घसरणीचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, मंगळवारी सोन्याची किंमत जवळपास दोन आठवड्यांच्या निच्चांकावर आली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धबंदीची घोषणा केल्यानंतर गुंतवणूकदार चिंतेत सापडले. त्याचा परिणाम लागलीच सोन्याच्या मागणीवर दिसून आला.