Gold: भारतापेक्षा दुबईत सोने स्वस्त? कर न भरता किती ग्रॅम मायदेशी आणता येते?
Gold : गेल्या काही दिवसांपासून भारतात सोन्याचे दर सतत वाढताना दिसत होते. त्यामुळे अनेकांनी दुबईत सोने प्रचंड स्वस्त असते आणि तेथून खरेदी करावे अशी इच्छा व्यक्त केली. चला जाणून घेऊया दुबईत खरच सोने स्वस्त असते का?

भारतात गेल्या काही दिवसांत सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात ४१३३ रुपयांची घट झाली असून सध्याचा दर सुमारे १ लाख ४८ हजार रुपये (प्रति १० ग्रॅम) इतका आहे. भारतात सोने तुलनेने महाग असल्याने अनेक जण विदेशातून, विशेषतः दुबईतून सोने खरेदी करण्याचा पर्याय निवडतात. दुबई विमानतळांवर सोन्याची दुकाने मोठ्या प्रमाणात दिसतात आणि तिथे सोने करमुक्त तसेच १०० टक्के शुद्ध मिळते.
सध्या दुबईत २४ कॅरेट सोन्याचा दर AED ४९७.२५ प्रति ग्रॅम आहे. भारतीय चलनात हे सुमारे १३,००८ रुपये प्रति ग्रॅम इतके होते. म्हणजे एक तोळा (१० ग्रॅम) सुमारे १,३०,०८० रुपये पडतो. भारतात मात्र २४ कॅरेट सोन्याचा दर १४,८८० रुपये प्रति ग्रॅम आहे. या तुलनेत दुबईत सोने सुमारे १२.६ टक्के स्वस्त आहे. हे दर मेकिंग चार्जेसशिवायचे आहेत.
दुबईतून सोने खरेदी करून भारतात आणणे बेकायदेशीर नाही, मात्र काही नियम पाळावे लागतात. परतल्यानंतर विमानतळावरील रेड चॅनेल काउंटरवर जाऊन कस्टम्स डिक्लेरेशन फॉर्म भरावा लागतो. त्यात खरेदी केलेल्या सोन्याचे वजन आणि किंमत अचूक नोंदवावी लागते.
महिलांसाठी करमुक्त मर्यादा: ४० ग्रॅम (कमाल मूल्य १ लाख रुपये) आहे तर पुरुषांसाठी: २० ग्रॅम (कमाल मूल्य ५० हजार रुपये) आहे.
ही मर्यादा ओलांडल्यास १५ ते १८ टक्के कस्टम ड्युटी आणि कर द्यावा लागतो. उदाहरणार्थ, दुबईत १३,००८ रुपये प्रति ग्रॅमने खरेदी केलेल्या सोन्यावर १५ टक्के ड्युटी लागल्यास सुमारे १,९६२ रुपये प्रति ग्रॅम अतिरिक्त खर्च येतो. अशा स्थितीत एकूण खर्च १५,०४२ रुपये प्रति ग्रॅम इतका होऊ शकतो, जो भारतातील दरापेक्षा महाग पडू शकतो. सध्या सोन्याचे दर वाढले असल्याने मूल्यमर्यादा अधिक महत्त्वाची ठरते. पुरुषांसाठी ५० हजार रुपयांच्या मर्यादेत केवळ सुमारे ३.८ ग्रॅम सोनेच करमुक्त आणता येते. त्यापेक्षा जास्त आणल्यास अतिरिक्त कर भरावा लागतो. त्यामुळे दुबईतून सोने आणताना वजन आणि मूल्याच्या मर्यादा तसेच कस्टम नियम काळजीपूर्वक पाळणे आवश्यक आहे.