
प्रसिद्ध बॉलिवूड गायिका नेहा कक्करने 2020 मध्ये रोहनप्रीत सिंहशी धूमधडाक्यात लग्न केलं. गेल्या काही महिन्यांपासून या दोघांच्या नात्यात कटुता आल्याची चर्चा आहे. इतकंच नव्हे तर नेहा आणि रोहनप्रीत घटस्फोट घेणार असल्याचंही म्हटलं जात आहे.

या चर्चांवर आता नेहाचा पती रोहनप्रीतने प्रतिक्रिया दिली आहे. 'ई टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत रोहनप्रीत म्हणाला, "नेहा आणि माझ्या नशिबात एकमेकांची साथ लिहिली होती. एका म्युझिक व्हिडीओसाठी आम्ही भेटलो आणि त्यानंतर आमच्यात जवळीक वाढली."

"माझ्यासोबत घडलेली ही सर्वोत्तम गोष्ट आहे. मी स्वत:ला नशीबवान समजतो. बाकी अफवांकडे मी फारसं लक्ष देत नाही. जर गॉसिप केल्याने काही लोकांना आनंद मिळत असेल तर त्यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे", असं रोहनप्रीत म्हणाला.

"नेहा आणि मी एकमेकांसोबत खुश आहोत. आम्ही आमचं काम आणि आयुष्यावर लक्ष केंद्रीत करत आहोत. मी जेव्हा नेहाकडे पाहतो तेव्हा मला याची जाणीव होते की ती किती नम्र आहे. मला तिच्याकडून खूप काही शिकायला मिळतं", अशा शब्दांत रोहनप्रीत व्यक्त झाला.

रोहनप्रीत सध्या 'सुपरस्टार सिंगर 3'या गायनाच्या शोचं सूत्रसंचालन करत आहेत. याच शोमध्ये त्याची पत्नी नेहा कक्कर ही परीक्षकाच्या भूमिकेत आहे.