
पाचवेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सने काल IPL 2022 मधला आपला शेवटचा सामना खेळला. मुंबईची जशी सुरुवात झाली होती, शेवट बिलकुल त्याच्या उलट झाला. आपल्या शेवटच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर पाच विकेट राखून विजय मिळवला. जसप्रीत बुमराह टीमच्या या विजयाचा नायक आहे. ज्याने जाता-जाता एक रेकॉर्डही आपल्या नावावर केला.

वानखेडे स्टेडियमवर दिल्ली विरुद्धच्या सामन्यात जसप्रीत बुमराहने 4 ओव्हर्समध्ये 3 विकेट घेतल्या. त्याने विजयाचा पाया रचला. 14 सामन्यात त्याने 15 विकेट घेतल्या. या सीजनमधला मुंबईचा तो सर्वात यशस्वी गोलंदाज आहे.

या 15 विकेटसह बुमराहने एक रेकॉर्डही आपल्या नावावर केला. सलग सात सीजनमध्ये 15 विकेट घेणारा तो पहिला भारतीय गोलंदाज बनला आहे. बुमराहने 2016 च्या सीजनमध्ये पहिल्यांदा 15 विकेट घेतल्या होत्या. त्यानंतर सातत्याने तो अशी कामगिरी करत आलाय.

बुमराहने 2020 च्या सीजनमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली. त्यावेळी बुमराहने 15 सामन्यात 27 विकेट घेतल्या. त्याच्या याच कामगिरीच्या बळावर मुंबई इंडियन्सने पाचव्या जेतेपदाला गवसणी घातली होती.

या सीजनमध्ये मुंबईची खराब सुरुवात आणि त्यानंतर झालेल्या सुधारणेचं कारण जसप्रीत बुमराह आहे. या सीजनच्या पहिल्या 10 सामन्यात बुमराहने फक्त 5 विकेट घेतल्या होत्या. पण नंतरच्या चार सामन्यात त्याने दुप्पट म्हणजे 10 विकेट घेतल्या.