
झी मराठी वाहिनीवरील लवकरच ‘कमळी’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेची कथा एका अशा मुलीची आहे जिला, ‘शिक्षण हाच उद्धाराचा आणि स्वाभिमानाचा मार्ग आहे’ हे माहीत आहे. लहानशा खेड्यातून बाहेर पडून तिला मुंबईत यायचंय आणि सगळ्यात नावाजलेल्या महाविद्यालयात शिक्षण घेऊन मोठं व्हायचं आहे.

आपल्या शिक्षणाचा उपयोग करुन तिला गावी महाविद्यालय सुरु करायचं आहे, जिथे तिच्यासारख्याच शिक्षणाची ओढ असणाऱ्या अनेक मुली शिकू शकतील. अनोखी कथा आणि मालिकेचे हटके प्रोमो यांमुळे ‘कमळी’ सोशल मीडियावर आधीपासूनच चर्चेत आहे.

आता ही मालिका एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. 'कमळी’च्या व्हायरल झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवस्तुतीच्या प्रोमोची सर्वत्र चर्चा झाली. यात 3000 पेक्षा जास्त मुलामुलींसोबत ठाण्यातील सरस्वती मंदिर ट्रस्ट, गोखले रोड नौपाडा ठाणे इथल्या पटांगणात शिवस्तुती गायली गेली.

ही छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखी मानवंदना होती आणि याची वर्ल्ड रेकॉर्डस् बुक ऑफ इंडियामध्ये नोंद झाली. हा उपक्रम सर्वांच्या मनात खोलवर रुजला. यावेळी कमळी म्हणजेच विजया बाबर, केतकी कुलकर्णी आणि निखिल दामले उपस्थित होते.

याआधीही मालिकेच्या टीमकडून स्तुत्य उपक्रम राबविण्यात आले होते. कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाडमधील शाळेत जाऊन ‘कमळी’ने 100 मुलींना सायकलींचं वाटप केलं होतं. दररोज 8 ते 10 किमीचं अंतर कापून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सायकल खूप उपयोगी पडली.