
महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असलेल्या आंगणेवाडी यात्रेसाठी दरवर्षी लाखो भाविक सहकुटुंब सहपरिवार दर्शनासाठी येतात. यात्रेसाठी येणाऱ्या लाखो भाविकांचा सहभाग लक्षात घेता यंदा स्टार प्रवाह वाहिनीकडून अनोखा उपक्रम राबवण्यात आला. भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता यात्रेत लहान मुलं हरवण्याची शक्यता असते. म्हणूनच लहान मुलांच्या सुरक्षेसाठी सेफ्टी बॅण्डसचं वाटप करण्यात आलं.

या अंतर्गत लहान मुलांच्या हातात स्टार प्रवाहकडून सेफ्टी बँड बांधण्यात आले. या बँडवर पालकांचं आणि पाल्याचं नाव आणि दूरध्वनी क्रमांक यांचा समावेश होता. कणकवली आणि मालवणवरुन येणाऱ्या मार्गावर हे दोन्ही कक्ष भाविकांच्या सेवेसाठी होते. भाविकांचं सहकुटुंब सहपरिवार सुरक्षित ठेवण्याच्या हेतूने हा उपक्रम करण्यात आला.

आंगणेवाडी ग्रामस्थांकडून व जिल्हा प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 30 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर आंगणेवाडी वर राहणार असून मोठा पोलीस बंदोबस्त ही तैनात करण्यात आला आहे.त्याच प्रमाणे .2 डीवायएसपी,31 अधिकारी,139 अंमलदार व 250 होमगार्डसह एक एसआरपी पथक व दोन दंगल नियंत्रण पथके तैनात करण्यात आली आहे.

मध्यरात्री पासून भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत.पहाटे 3 वाजल्या पासून दर्शन दिलं जात आहे.भाविकांना सुलभ दर्शन व्हावं म्हणून आंगणेवाडी ग्रामस्थांनी प्रशासनासह योग्य नियोजन करत दर्शनासाठी 10 रांगांचं नियोजन करण्यात आले आहे.

यात्रेकरूंची कोणतीही अडचण होऊ नये म्हणून आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळ आणि पोलीस प्रशासन या ठिकाणी काळजी घेत आहेत. कोरोनाचे नियम पाळून यात्रा उत्साहात सुरू झाली आहे.