
कोकणच्या किनारपट्टीवर पुन्हा एकदा निसर्गाचा अद्भुत सोहळा रंगला आहे. थंडीची चाहूल लागताच, सुदूर सायबेरियातून तब्बल ५ ते ६ हजार किलोमीटरचा प्रवास करून सीगल पक्षी या विदेशी पाहुण्यांचे कोकणात आगमन झाले.

निळ्याशार आभाळाखाली पांढऱ्या पंखांचे हे थवे सध्या कोकणच्या किनाऱ्यांची शोभा वाढवत आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला हे पक्षी दाखल झाले आहेत.

हे सीगल पक्षी रशिया आणि उत्तर युरोपमधील बर्फाच्छादित प्रदेशातून ते उष्ण वातावरणाच्या शोधात येतात. कोकणातील हर्णे, दापोली, गणपतीपुळे, आरे-वारे यांसारख्या प्रसिद्ध किनाऱ्यांवर सध्या या पक्ष्यांची मोठी वर्दळ दिसत आहे.

उबदार हवामान आणि सागरी अन्नसाठा ही या पक्ष्यांच्या आगमनाची दोन प्रमुख कारणे आहेत. ते समुद्रातील लहान मासे, कोळंबी आणि कीटक यावर आपली उपजीविका करतात.

समुद्रावर झेपावणारे हे पांढरे थवे, वाऱ्याशी खेळणारी त्यांची उडाण आणि त्यांचा गोड किलबिलाटाने यामुळे साऱ्या किनाऱ्यांना एक नवचैतन्य लाभले आहे.

या मनमोहक दृश्यामुळे पर्यटक, छायाचित्रकार आणि निसर्गप्रेमी मोठ्या प्रमाणात कोकणात दाखल होत आहेत. हा नैसर्गिक नजारा अधिकच मोहक आणि चित्तवेधक बनला आहे.

सायबेरियातून कोकणापर्यंतचा त्यांचा हा प्रवास म्हणजे जणू निसर्गाची प्रेमयात्रा असून प्रेम आणि स्वातंत्र्याला सीमा नसतात असा संदेश देतात. फेब्रुवारीच्या अखेरीस पावसाळ्याची चाहूल लागताच हे पाहुणे पक्षी पुन्हा आपल्या मायदेशी परततील.

या पांढऱ्या पाहुण्यांमुळे कोकणचे आकाश व समुद्र दोन्ही उजळून निघाले आहे. तसेच कोकणातील सर्व किनारपट्ट्या सीगल पक्षांनी फुलून गेल्या आहेत.