Mumbai : बिबट्याला बघायचंय गोरेगावला या! ‘त्या’ पोस्टरची सर्वत्र चर्चा, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
Mumbai : मानवी वस्तींमध्ये आता बिबट्याचा वावर वाढताना दिसत आहे. मुंबई येथील गोरेगाव याठिकाणी अनेकादा मुक्त संचार करताना दिसला. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अशात प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी एक पोस्टर तयार केला आहे. त्या पोस्टरची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे.

मुंबईतील गोरेगाव पूर्व येथील दिंडोशी परिसरात पुन्हा एकदा बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील नागरिक जीव मुठीत घेवून जगत आहे. विशेषतः रहेजा सोसायटीजवळ बिबट्या वारंवार पाहायला मिळत असल्यामुळे स्थानिक रहिवासी चिंतेत आहेत.
परिसरात सतत बिबट्याचं दर्शन होत असल्याने वनविभागाने या प्रकरणी तातडीने कठोर पावले उचलून बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. यावर नागरिकांचा अनोखा आणि उपरोधिक निषेध केला आहे.
बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे त्रस्त झालेल्या आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी या भागातील नागरिकांनी एक हटके आणि उपरोधिक पोस्टर तयार केले आहे. या पोस्टरवर लिहिले आहे: "आता बिबट्याला बघण्यासाठी कुठे बाहेर जाण्याची गरज नाही.. आता आपली भेट थेट गोरेगावमध्येच होणार!"
गोरेगाव पूर्वेकडील हा भाग संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या (SGNP) लगत असल्यामुळे अनेकदा वन्यजीव नागरी वस्तीत येण्याच्या घटना घडतात. मात्र, वारंवार होणाऱ्या या दर्शनामुळे लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
स्थानिक नागरिकांनी वनविभागाला या परिसरात गस्त वाढवण्याचे आणि बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावून सुरक्षित उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.