
नांदेडमध्ये तृतीयपंथीयांच्या घरी जाऊन त्यांचं कोरोना लसीकरण करण्यात आलं. जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी पुढाकार घेऊन तृतीयपंथीयांचे लसीकरण स्वतः उभे राहून करून घेतलं.

तृतीयपंथीयांचा समाजाच्या सर्व घटकांशी थेट संपर्क येत असतो, त्यामुळे त्यांचं लसीकरण करुन घेतल्याचं इटनकरांनी सांगितलं. जिल्हा प्रशासनाच्या या अभिनव उपक्रमामुळे तृतीयपंथीय भावूक झाले. यावेळी तृतीयपंथीयांनी आपबिती सांगत आठवणींना उजाळा दिला.

"आधार काढायला जावं, तर नाव लागेल. नाव सांगायला जावे तर तलाठी किंवा ग्रामपंचायत अशा ठिकाणच्या नोंदी लागतील. वय सांगायला जावे तर जन्माचा दाखला किंवा टीसी लागेल. न आम्ही या कागदात मोडतो, न त्या कागदात. आमची ही व्यथा जवळपास सर्वच गावात सारखी आहे. अनेक वर्षे झेललेल्या या व्यथेला आता राज्याच्या सामाजिक न्याय विभागातर्गंत एक आश्वासक चित्र आम्ही पाहत आहोत" अशा भावना तृतीयपंथीयांनी मांडल्या.

"जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना साऱ्या व्यथा आम्ही घेऊन भेटलो. राहण्याच्या घरापासून ते स्मशानभूमीपर्यंतचे आमचे प्रश्न त्यांनी शांततेत ऐकून घेतले." याबद्दल तृतीयपंथी समाजातर्फे गौरी यांनी आभार व्यक्त केले.

"साधी कोरोनाची लस घ्यावी तर पुन्हा हा सरकारी दप्तरात आवश्यक असणारा ओळखीचा कागद अर्थात आधारकार्ड अथवा इतर ओळखपत्र देणे आवश्यक होते. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी यात अत्यंत प्रगल्भ अशी भूमिका निभावून लसीकरणाचा हा लाभ आमच्या वस्तीत येऊन दिला" याबद्दल गौरी यांनी विशेष आभार मानले.