
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन्सहून अमरावतीकडे निघालेल्या अमरावती एक्सप्रेसला धान्याने भरलेल्या एका ट्रकने जोरदार धडक दिली. जळगावातील बोदवडमध्ये रेल्वेचा भीषण अपघात झाला.

अमरावती एक्सप्रेस आणि त्या ट्रकचा अपघात इतका भीषण होता की त्या ट्रकच्या पुढच्या भागाचा पूर्ण चुराडा झाला. सुदैवाने रेल्वेचा वेग कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली.

आज सकाळी पहाटे ४.३० च्या सुमारास अमरावती एक्सप्रेस (१२१११) ही गाडी बोदवड रेल्वे स्थानकाजवळ आली. यावेळी एक ट्रक चालकाने रेल्वे गेट तोडून ट्रक ओलांडण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी अचानक अमरावती एक्सप्रेस आली आणि हा ट्रक थेट एक्सप्रेसच्या इंजिनवर जाऊन धडकला.

या घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र अपघातानंतर ट्रक चालक ट्रक जागेवरच सोडून फरार झाला.

बोदवड रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे फाटक सध्या बंद आहे. या ठिकाणी नवीन पूल बांधण्यात आला आहे. मात्र या नवीन पुलाबद्दल स्थानिकांमध्ये जनजागृती झालेली नाही. शुक्रवारी सकाळी गहू भरलेल्या ट्रकच्या ट्रक चालकाने रेल्वे रुळ ओलांडण्याचा प्रयत्न केला. पण त्याचवेळी हा अपघात घडला.

जळगावात झालेल्या या रेल्वे अपघातामुळे अनेक गाड्या उशिराने धावत आहेत. पुरी सुपरफास्ट एक्सप्रेस ही सकाळी चार वाजता वरणगाव येथे थांबवण्यात आली. तर 4:30 वाजताची शालीमार एक्सप्रेस ही अजूनही भुसावळ येथे थांबली आहे.

त्यासोबतच नवजीवन सुपरफास्ट एक्सप्रेस सहा वाजताची ही तीन तासापासून जळगाव रेल्वे स्थानक येथे थांबली आहे. त्यासोबतच सकाळी तीन वाजताची प्रेरणा एक्सप्रेस अजूनही बोदवडच्या जवळ थांबली आहे. या अपघातामुळे मुंबई नागपूर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

या अपघातानंतर तीन ते चार तासांनी रेल्वे वाहतूक सुरळीत झाली आहे.

रेल्वे प्रशासनाने धान्याने भरलेला ट्रक रेल्वे रुळावरून हटवला आहे. तसेच रेल्वे रुळावर पडलेले धान्यही हटवण्यात आले आहे.

या अपघातात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. तसेच रेल्वे स्थानक जवळ असल्याने आणि रेल्वे धीमी झाली होती मोठा अनर्थ टळला, अशी भावना व्यक्त होत आहे. मात्र ट्रक चालक ट्रक सोडून पसार झाला आहे.