
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'मन धागा धागा जोडते नवा' या मालिकेतल्या सार्थक-आनंदीच्या जोडीला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. सार्थकचं आनंदीवर जीवापाड प्रेम आहे. आपल्या प्रत्येक कृतीतून आनंदीवरचं प्रेम आणि तिच्याविषयी वाटणारा आदर तो व्यक्त करत असतो.

सार्थकसारखा समजून घेणारा आणि चांगल्या-वाईट प्रसंगांमध्ये खंबीरपणे पाठीशी उभा रहाणारा जोडीदार मिळाला तर आयुष्य सुखकर होतं याची अनुभूती ही मालिका पहाताना मिळते.

लवकरच संपूर्ण कुटुंबाच्या साक्षीने हे दोघं पुन्हा एकदा लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. सार्थक-आनंदीची हळद, मेहंदी, संगीत आणि लग्न हे सगळे विधी अगदी पारंपरिक पद्धतीने पार पडणार आहेत.

आनंदी-सार्थकच्या परिवारासोबतच स्टार प्रवाहच्या कुटुंबातले सदस्यही या विवाहसोहळ्यासाठी उपस्थित रहाणार आहेत. कला-अद्वैत, जानकी-हृषिकेश, पिंकी-युवराज, नित्या-अधिराज, सायली-अर्जुन या स्टार प्रवाहच्या लोकप्रिय जोड्या आनंदी-सार्थकला शुभेच्छा देण्यासाठी पोहोचणार आहेत.

'मन धागा धागा जोडते नवा' ही मालिका दररोज संध्याकाळी 6.30 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते. या मालिकेत दिव्या पुगावकर आणि अभिषेक राहाळकर यांच्या मुख्य भूमिका आहेत.