
रविवारी 15 जून 2025 रोजी सकाळी 'सुंदर मी होणार' या नाटकाच्या प्रयोगाला काही तास उरले असतानाच अभिनेते अमोल बावडेकर यांना हृदयविकाराचा झटका आला.

अमोल यांच्या पत्नी प्रेरणा बावडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यावरही बावडेकर यांनी डॉक्टरांना विनंती केली की, "मला फक्त तीन तासांची परवानगी द्या. मी प्रयोग करून येतो आणि मग तुम्ही माझी शस्त्रक्रिया करा."

मात्र डॉक्टरांनी अर्थातच याला परवानगी दिली नाही. त्यामुळे दीनानाथ नाट्यगृहातील जवळपास हाऊसफुल्ल प्रयोग रद्द करावा लागला. तीन तास काय, 30 दिवस हलायचं नाही इथून.. असं डॉक्टरांनी त्यांना खडसावलं.

अमोल यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली असून सोमवारी त्यांना आयसीयूमधून बाहेर आणलं. डॉक्टरांनी त्यांना सध्या विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असला तरी ते लवकरच 'सुंदर मी होणार' या नाटकाच्या प्रयोगांसाठी परत येतील.

दरम्यान, बावडेकर यांच्या अनुपस्थितीत नाटकाचे काही प्रयोग अभिनेते अनिरुद्ध जोशी करणार आहेत. 'सुंदर मी होणार' या नाटकात विद्याधर जोशी, अभिजीत चव्हाण, स्वानंदी टीकेकर, अमोल बावडेकर, सृजन देशपांडे, श्रुती पाटील, विराजस ओढेकर, आस्ताद काळे आणि श्रुजा प्रभुदेसाई यांच्या भूमिका आहेत.