Mithun Chakraborty House Tour: स्टेडियम, प्रायव्हेट स्टुडिओ, जिम.. राजमहालापेक्षाही मोठं मिथुन चक्रवर्ती यांचं घर
साध्या सुरुवातीपासून बॉलिवूडमधील मोठं नाव आणि आता राजवाड्यासारखं घर.. मिथुन दा यांचा हा प्रवास नक्कीच लक्षवेधी आहे. मड आयलँड याठिकाणी त्यांचं हे आलिशान फार्महाऊस आहे. यात सर्व सुखसुविधा आहेत.

बॉलिवूडचे ‘डिस्को डान्सर’ म्हणून प्रसिद्ध असलेले अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी आपल्या अभिनय आणि डान्सच्या जोरावर सिनेसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली. मात्र, त्यांचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. एकेकाळी मुंबईत संघर्ष करताना कारमध्ये झोपण्याची वेळ आलेल्या मिथुन दांचं आजचं आयुष्य अत्यंत आलिशान आहे.
मुंबईतील मड आयलँड परिसरात असलेलं त्यांचं फार्महाऊस एखाद्या राजवाड्यापेक्षा कमी नाही. मिथुन चक्रवर्ती यांचं मड आयलँडमधील फार्महाऊस तब्बल 1.5 एकर म्हणजेच सुमारे 65 हजार चौरस फूट परिसरात पसरलेलं आहे. हे केवळ एक घर नसून संपूर्ण कुटुंबासाठी तयार केलेलं मोठं प्रॉपर्टी स्पेस आहे.
घराभोवती मोठ्या प्रमाणात हिरवळ असून, निसर्गाच्या सान्निध्यात शांत वातावरण अनुभवता येतं. या फार्महाऊसची सर्वात खास गोष्ट म्हणजे कुटुंबातील सदस्यांसाठी स्वतंत्र कॉटेजची व्यवस्था असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे ही प्रॉपर्टी एखाद्या आलिशान रिसॉर्टसारखीच वाटते.
प्रशस्त परिसर, हिरवळ आणि वेगवेगळ्या भागांमध्ये विभागलेली रचना यामुळे मिथुन दांचं हे घर चर्चेचा विषय ठरतं. फार्महाऊसमध्ये फक्त राहण्याचीच सोय नाही, तर मनोरंजन आणि फिटनेससाठीही विविध सुविधा असल्याचं समोर आलं आहे.
प्रायव्हेट जिम, स्टुडिओ आणि मोठ्या स्पोर्ट्स एरियाचा या प्रॉपर्टीमध्ये समावेश आहे. इतकंच नाही तर इथे स्वतःचं स्टेडियमसुद्धा आहे. त्यामुळे मिथुन दा आणि त्यांच्या कुटुंबासाठी ही जागा घरासोबतच आराम आणि मनोरंजनाचं खास ठिकाण आहे.
मिथुन चक्रवर्ती यांच्या आजच्या या आलिशान जीवनशैलीमागे मोठा संघर्ष आहे. फिल्म इंडस्ट्रीत सुरुवातीच्या काळात त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. कामाच्या शोधात मुंबईत आलेल्या मिथुन दांना सुरुवातीला स्थिरता मिळाली नव्हती.
संघर्षाच्या काळात त्यांनी कारमध्ये झोपल्याचाही उल्लेख अनेकदा केला आहे. यानंतर ‘मृगया’मधून त्यांनी अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केलं आणि पुढे 'डिस्को डान्सर'ने त्यांना मोठी लोकप्रियता मिळवून दिली. त्यानंतर त्यांनी हिंदी आणि बंगाली चित्रपटांमध्ये अनेक महत्त्वाच्या भूमिका साकारल्या.
आज त्यांच्या नावावर मोठी कारकीर्द, पुरस्कार आणि आलिशान जीवनशैली आहे. मिथुन चक्रवर्ती यांचं मड आयलँडमधील हे फार्महाऊस त्यांच्या संघर्षापासून यशापर्यंतच्या प्रवासाची झलक दाखवतं.