राज्य सरकारने मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात केल्यानंतर आता यांची सुरक्षा ‘महाराष्ट्र रक्षक’ करणार आहेत.
मनसेचे सरचिटणीस नयन कदम यांनी खास राज ठाकरेंच्या रक्षणासाठी ही टीम तयार केली आहे.
राज्य सरकारने 10 जानेवारीला राज्यातील भाजपचे बडे नेते आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेच्या कपातीचा निर्णय घेतला. या निर्णयांतर्गत राज यांची झेड (Z) दर्जाची सुरक्षा काढून घेण्यात आली होती.
राज ठाकरे यांना सध्या राज्य सरकारकडून वाय (Y) दर्जाची सुरक्षा पुरवली जात आहे.
या निर्णयामुळे राज्य सरकारवर सर्व स्तरातून टीका झाली होती. आम्हाला सरकारच्या सुरक्षेची गरज नसून राज ठाकरे यांचे रक्षण करण्यासाठी आम्ही समर्थ आहोत, असे मनसेच्या नेत्यांनी म्हटले होते.
मनसेने तयार केलेली ही महाराष्ट्र रक्षक टीम राज यांचे संरक्षण करणार आहे. यापुढे ही टीम काळे टी-शर्ट्स घालून राज यांच्या आजूबाजूला दिसेल. राज ठाकरे ज्या-ज्या ठिकाणी जातील त्या सर्व ठिकाणी मनसेची ही महाराष्ट्र रक्षक टीम उपस्थित असेल.
आगामी महानगरपालिका आणि सध्याच्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेची आज महत्त्वाची बैठक आहे. राज ठाकरे हे या बैठकीला उपस्थित असतील. यावेळीसुद्धा राज यांच्या संरक्षणासाठी हे महाराष्ट्र रक्षक तैनात असतील.
मनसेचे सरचिटणीस नयन कदम यांनी खास राज ठाकरेंच्या रक्षणासाठी ही टीम तयार केली आहे.