
खरीप हंगामातील पहिले पीक असलेल्या मुगाच्या शेंगाची तोडणी सध्या सुरू आहे. बळीराजाच्या 'पोळा' या सणाचा खर्च भागवणारे पीक अशी मुगाच्या पिकांची पूर्वापारपासून ओळख आहे.

यंदा ऐन तोडणीच्या हंगामातच पावसाने संततधार लावल्याने काही प्रमाणात मूग भिजलाय, त्यामुळे मुगाचे पीक शेतकऱ्यांला उन्हात वाळत घालावे लागतंय. सध्या नांदेडमध्ये मूग पिकाची तोडणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

शेतकरी घरातल्या सर्वांना घेऊन मूग तोडणीमध्ये व्यस्त असल्याचे चित्र शेत शिवारात दिसतंय. खरीप हंगामातील पहिले नगदी पीक आता बळीराजाच्या हाथात आल्याने बाजारात नवचैतन्य पाहायला मिळणार आहे.

मान्सूनच्या लहरीपणामुळे तीन वर्षांपासून मुगाचे पीक नीट येऊ शकलं नव्हतं, मात्र यंदा उत्पादनात घट असली तरी पीक आल्याने बळीराजा समाधानी आहे.

गेल्या काही दिवसांत नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात अनेक जागी पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. किनवट तालुक्यात रस्त्यांचे मोठे नुकसान झालेय, तर असंख्य शेतकऱ्यांची पिके देखील पाण्याखाली बुडालेली आहेत.

मूग काढणासीठी शेतकऱ्यांची लगबग सुरु असून मूग तोडणी करुन शेतकरी बाजारात विकतो. येणाऱ्या बैलपोळा सणाचा खर्च शेतकरी या पैशातून भागवतात. मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या हातात यंदाच्या खरिप हंगामातील पीक येणार असल्यानं शेतकऱ्यांमध्ये थोडे फार आनंदाचं वातावरण आहे.

पावसानं भिजल्यानं शेतकरी मुगाच्या शेंगांची तोडणी करुन ते वाळत टाकत असल्याचंही चित्र पाहायला मिळत आहे. मूग काढणीत शेतकरी व्यस्त असल्याचं चित्र आहे.