‘सहकुटुंब सहपरिवार’ फेम नंदिताने उत्तराखंडच्या ‘या’ प्रसिद्ध मंदिरात पुन्हा केलं लग्न
मराठमोळी अभिनेत्री नंदिता पाटकरने उत्तराखंडच्या त्रियुगीनारायण मंदिरात पुन्हा एकदा लग्नगाठ बांधली आहे. नाट्य दिग्दर्शक विपुल महागांवकरशी तिने लग्न केलं आहे. या लग्नाचे फोटो नंदिताने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री नंदिता पाटकरने दिग्दर्शक विपुल महागांवकरशी पुन्हा लग्नगाठ बांधली आहे. काही दिवसांपूर्वीच या दोघांनी कोर्ट मॅरेज केलं होतं. त्यानंतर आता उत्तराखंडच्या अत्यंत प्रसिद्ध मंदिरात त्यांनी विधीवत लग्न केलं. या लग्नाचे फोटो पोस्ट करत नंदिताने भावना व्यक्त केल्या आहेत.

'काही क्षण आपल्याकडून प्लॅन केले जातात तर काही आपल्यासाठी प्लॅन केले जातात. हा क्षण खरोखरंच त्यापैकी एक आहे. स्वत:साठी आपण निर्माण केलेलं संरक्षण कवच बाजूला सारून त्या एका व्यक्तीवर विश्वास ठेवणं कधीच सोपं नव्हतं. पण हळूहळू हे आपोआपच घडत गेलं', असं तिने म्हटलंय.

'अखेर आम्ही अशा एका ठिकाणी एकत्र येण्याचा निर्णय घेतला, जे स्त्री-तत्त्व आणि पुरुष-तत्त्व यांच्या मिलनाचा उत्सव साजरा करतं. तिथे जाण्याचं स्वप्न आम्ही नेहमीच पाहिलं असलं तरी जेव्हा ते अखेर सत्यात उतरलं, तेव्हा तो अनुभव एखाद्या स्वप्नासारखाच वाटला', असं नंदिताने पुढे लिहिलं आहे.

त्रियुगीनारायण मंदिरात सर्व पवित्र विधींसह विवाहबंधनात अडकणं हा एक अवर्णनीय अनुभव असल्याची भावना तिने व्यक्त केली. उत्तराखंडमधल्या रुद्रप्रयाग जिल्ह्यात त्रियुगीनारायण हे मंदिर भगवान शिव आणि माता पार्वतीच्या विवाहाचं पवित्र स्थान म्हणून ओळखलं जातं. त्रेतायुगात भगवान विष्णू यांनी याठिकाणी शिव-पार्वतीचं लग्न लावून दिलं होतं, असं म्हटलं जातं.

'एलिझाबेथ एकादशी', 'बाबा', 'बालभारती', 'पंचक', 'आणि.. डॉ. काशिनाथ घाणेकर' यांसारख्या चित्रपटांमध्ये नंदिताने भूमिका साकारल्या आहेत. नंदिताचा पती विपुल नाट्य दिग्दर्शक आहे. 'पै पैशाची गोष्ट' आणि 'उद्ध्वस्त धर्मशाळा' यांसारख्या नाटकांमधून विपुल महागांवकरने आपली वेगळी ओळख निर्माण केली.