
'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेने अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली आहे. सध्या या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. अभिराम आणि लीलाची जोडी प्रेक्षकांना भावतेय. नुकतंच वटपौर्णिमेला लीलाने एजेसाठी वडाच्या झाडाला 1001 प्रदक्षिणा घातल्या.

वटपौर्णिमेनंतर एजे आणि लीलालचं नातं रुळावर येईल, असं वाटलं होतं. पण आयुष्यात सगळंच गोड गोड कसं असेल? तरीसुद्धा हळूहळू एजे-लीलाच्या संसाराची गाडी पुढे सरकत आहे. दोघंही आजीच्या सांगण्यावरून एका खोलीत राहायला तयार होतात.

जे एकमेकांच्या नजरेलाही नजर देत नाहीत त्यांच्यासाठी एका खोलीत राहणं म्हणजे तारेवरची कसरत असणार. एजेला एसीशिवाय जमत नाही आणि लीला बिचारी एसीमध्ये गारठून जाते. लीलाला अंधाराची भीती असते तर एजेला उजेडात झोपायची सवय नाही.

एजे आणि लीला यांच्या इम्परफेक्ट संसाराची ही केवळ सुरुवात आहे. हे सर्व होत असताना एजे-लीलाच्या रिसेप्शनचा दिवस उजाडतो. लीलाला कडक सूचना देण्यात आली की मीडियासमोर काहीही बोलायचं नाही. पण जिथे लीला आहे तिथे तर जे व्हायचं नाही ते होणारच.

मीडियाकडून प्रश्नांचा भडीमार झाल्याने लीला भंडावून जाते. तिच्या तोंडून असं काही निघतं की सगळेच हादरतात आणि तितक्यात एजे तिथे येतो. लीलाच्या रिसेप्शनमध्ये खास पाहुणी बनून लीलाची मैत्रीण वसुंधरानेही हजेरी लावली आहे.