
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिकेत नव्या 'गोली'ची एण्ट्री झाली आहे. अभिनेता धर्मित शाह मालिकेत यापुढे गोलीची भूमिका साकारणार आहे. काही दिवसांपूर्वीच कुश शाहने ही मालिका सोडली होती.

धर्मितची ही पहिलीच मालिका असून 'तारक मेहता..' मधून त्याने अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. मालिकेतील गोलीच्या भूमिकेसाठी ऑडिशन देण्यासाठी त्याला त्याच्या मित्रांनी प्रोत्साहित केलं होतं. धर्मित हा अगदी कुशसारखाच दिसत असल्याने मित्रांनी ऑडिशन देण्याचं सुचवलं होतं.

'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत धर्मित म्हणाला, "जरी मी कुशची जागा घेतली असली तरी या मालिकेसाठी मी 100 टक्के मेहनत घेईन. त्यासाठी मी पूर्णपणे तयार आहे."

"निर्माते असित कुमार मोदी यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. ऑडिशनमध्ये माझी निवड केली. यामुळे मी खूप खुश आहे. मला सेटवर येऊन फक्त सहाच दिवस झाले आहेत. पण माझी तुलना कुशसोबत होत असेल तर ते चुकीचं आहे. कारण मला माझ्या स्टाइलने ती भूमिका साकारायची आहे", असं तो पुढे म्हणाला.

"कुशची स्वत:ची वेगळी स्टाइल होती आणि माझी स्टाइल वेगळी आहे. मी कोणालाच कॉपी करणार नाही. टप्पू सेनाबद्दल बोलायचं झाल्यास माझी सध्या टप्पू आणि पिंकूसोबत सेटवर चांगली मैत्री झाली आहे."