
ज्या खात्यावर नागरिकांचा सर्वाधिक विश्वास असतो, त्याच टपाल विभागाच्या विश्वासार्हतेला पांढरकवडा येथे मोठा तडा गेला आहे. नागरिकांची महत्त्वाची कागदपत्रे, कायदेशीर नोटीस आणि बँकिंग साहित्य सुरक्षित पोहोचवण्याची जबाबदारी एका पोस्टमनवर असते.

मात्र एका पोस्टमनने आपल्या कर्तव्यात कसूर करत शेकडो लोकांचे टपाल चक्क आपल्या घरात साठवून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सतीश धुर्वे असे या निष्काळजी पोस्टमनचे नाव आहे. त्याच्या घरातून टपालाने भरलेली तब्बल तीन पोती जप्त करण्यात आली आहेत.

पांढरकवडा येथील मंगलमूर्ती लेआऊटचे रहिवासी आणि ज्येष्ठ विधिज्ञ गाजी इबादुल्ला खान यांनी याप्रकरणी तक्रार केली होती. गेल्या एक वर्षापासून त्यांना मिळणारी महत्त्वाची कायदेशीर पुस्तके, नोटीस आणि इतर टपाल मिळत नव्हते.

वारंवार पाठपुरावा करूनही टपाल मिळत नसल्याने त्यांनी संशय व्यक्त केला होता. २२ डिसेंबर रोजी पोस्टमन धुर्वे कार्यालयात गैरहजर असताना, त्यांच्या संशयास्पद आणि उद्धट वर्तणुकीमुळे खान यांनी वरिष्ठांकडे तक्रार दाखल केली.

वरिष्ठ डाक अधिकाऱ्यांनी तक्रारीची दखल घेत पोस्टमन सतीश धुर्वे याच्या घराची झडती घेण्याचे आदेश दिले. जेव्हा पथकाने धुर्वे याच्या घरी जाऊन तपासणी केली, तेव्हा अधिकारीही चक्रावून गेले.

सतीश धुर्वे यांच्या घरात टपालाने गच्च भरलेली तीन मोठी पोती आढळून आली. यात लोकांचे महत्त्वाचे अर्ज, बँकांचे धनादेश, कायदेशीर नोटीस आणि पार्सल्सचा समावेश होता. अनेकांचे भवितव्य टांगणीला पोस्टमनच्या या कृत्यामुळे परिसरातील अनेक तरुणांची नोकरीची कॉल लेटर्स, वृद्धांचे पेन्शन पेपर, व्यापाऱ्यांचे धनादेश आणि न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणांच्या नोटीस वेळेवर पोहोचल्या नाहीत.

यामुळे अनेकांचे आर्थिक नुकसान झाले असून काहींना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले आहे. हे टपाल धुर्वेने जाणीवपूर्वक का साठवून ठेवले होते, याचा तपास आता सुरू आहे. या गंभीर प्रकारामुळे पांढरकवडा शहरात संतापाची लाट उसळली आहे.

केवळ पोस्टमनवरच नाही, तर एवढा मोठा प्रकार वर्षभर सुरू असताना त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही फौजदारी कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत. विश्वासार्हतेचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या पोस्टाच्या या कारभारामुळे आता सामान्यांनी दाद मागायची कोणाकडे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.