
वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात येत्या २ नोव्हेंबर रोजी साजरी होणाऱ्या कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

या नेत्रदीपक रोषणाईमुळे संपूर्ण मंदिर परिसर दिव्यांच्या प्रकाशात न्हाऊन निघाला आहे. यामुळे मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पश्चिम आणि व्हीआयपी गेटच्या प्रवेशद्वारावर रोषणाई पाहायला मिळत आहे. यात मंदिराच्या कळसांपासून ते मुख्य प्रवेशद्वारांपर्यंत ही विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यामुळे दूरून येणाऱ्या भाविकांचे मन प्रसन्न होत आहे.

यंदा कार्तिकी यात्रेसाठी सुमारे ८ ते १० लाख भाविक पंढरपुरात येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर समितीने २६ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर या कालावधीत विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन 24 तास सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

तसेच सामान्य भाविकांच्या सोयीसाठी या काळात व्हीआयपी दर्शन आणि पालंग (शेजारती) हे राजोपचार बंद ठेवण्यात आले आहेत. या काळात भक्तांना २४ तास मुखदर्शन उपलब्ध असणार आहे. तसेच, २२ तास १५ मिनिटे पदस्पर्श दर्शन घेता येणार आहे.

कार्तिकी यात्रेनिमित्त भाविकांच्या सोयीसाठी चंद्रभागा नदीच्या तीरावर आणि वाळवंट परिसरात कपडे बदलण्याचे कक्ष, महिलांसाठी हिरकणी कक्ष आणि सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीनची व्यवस्था करण्यात आली आहे.