
नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. यामध्ये अभिनेता रणबीर कपूर हा प्रभू श्रीराम आणि साई पल्लवी ही सीतेच्या भूमिकेत पहायला मिळणार आहेत. या चित्रपटातील इतर भूमिकांवरूनही पडदा उचलण्यात आला आहे.

'रामायण'मध्ये लहानपणीच्या सीतेच्या भूमिकेसाठी टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध बालकलाकाराची निवड करण्यात आली आहे. कियारा ही भूमिका साकारणार आहे. 'पंड्या स्टोर'मध्ये भूमिका साकारलेली कियारा साधची निवड छोट्या सीतेच्या भूमिकेसाठी करण्यात आली आहे.

कियाराने 'पंड्या स्टोर' या गाजलेल्या हिंदी मालिकेत छुटकीची भूमिका साकारली होती. कियाराने 'रायसिंघानी वर्सेस रायसिंघानी' या मालिकेत छोट्या अनुष्काची (जेनिफर विंगेट) भूमिका साकारली होती. त्याचप्रमाणे तिने बऱ्याच जाहिरातीसुद्धा केल्या आहेत.

‘रामायण’ या चित्रपटात सीतेच्या भूमिकेसाठी आधी अभिनेत्री आलिया भट्टच्या नावाची चर्चा होती. मात्र आलियाच्या जागी प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवीची निवड झाल्याचं कळतंय. या भूमिकेसाठी तिने दहा कोटी रुपये मानधन मागितल्याचं कळतंय.

'दंगल' फेम नितेश तिवारी या चित्रपटाचं दिग्दर्शन करत असून केवळ साईच नव्हे तर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आणखी काही मोठे कलाकार 'रामायण'मध्ये दिसणार असल्याचं कळतंय. अभिनेता विजय सेतुपती या चित्रपटात विभीषणाची भूमिका साकारणार असल्याचं म्हटलं जातंय.