
नारायण राणेंच्या घराबाहेर काँग्रेसनं आंदोलन केलंय. सिंधुदुर्गात काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शनं करत यावेळी जोरदार घोषणाबाजी केली.

काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोदींनी महाराष्ट्राबाबत केलेल्या वक्तव्यावरुन तीव्र निषेध करत राज्यभर आंदोलनाचा धडाका सुरु ठेवला आहे.

सोमवारी देवेंद्र फडणवीसांच्या घराबाहेर आंदोलन करण्यासाठी उतरल्यानंतर प्रचंड तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर मंगळवारी तळकोकणार राणेंच्या घराबाहेर आंदोलन करण्यात आलं.

काँग्रेस कार्यकर्त्यांनी झेंडे आणि पोस्टरबाजी करत नारायण राणेंविरोधात निदर्शनं केली. तसंच मोदींविरोधात आणि भाजपविरोधात यावेळी आंदोलनं करण्यात आली.

मोदींनी महाराष्ट्रामुळे यूपी-बिहारमध्ये कोरोना पसरला, असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली असून नाना पटोलेंच्या नेतृत्त्वाखाली राज्यभर आंदोलनाचा धडाका सुरु आहे.

काँग्रेस नेत्यांच्या घराबाहेर सुरु केलेल्या या आंदोलनावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी या आंदोलनाबाबात वेगळी भूमिका मांडली आहे. नवाब मलिक यांच्यापाठोपाठ आता दिलीप वळसे पाटील यांनीदेखील नेत्यांच्या घराबाहेर आंदोलन करणं काही योग्य नाही, असं दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलंय.

दरम्यान, निषेध आंदोलन करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना यावेळी सिंधुदुर्ग पोलिसांनी ताब्यात घेतलंय.