
अमेरिकेतील तीन दिवसांच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi US Visit) बुधवारी अमेरिकेच्या दौऱ्यावर रवाना झाले. पंतप्रधान मोदी गुरुवारी सकाळी वॉशिंग्टन डीसीला पोहोचले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत पोहोचताच त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. अमेरिकेचे वरिष्ठ नेते यावेळी उपस्थित होते. भारतीय राजदूत तरणजीत सिंह संधू यांनी खास व्यवस्था केली.

विमानतळावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी वॉशिंग्टनमधील एका हॉटेलकडे रवाना झाले. तिथेही भारतीयांनी मोदींचं जंगी स्वागत केलं.

अमेरिकेत पोहोचल्यानंतर परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला यांनी ट्विट केले, 'नमस्ते यूएसए! आगमनानंतर पंतप्रधान मोदींचे अमेरिकेतील राजदूत तरनजीत सिंग संधू आणि जो बिडेन प्रशासनाचे अधिकारी ब्रायन मॅकेन यांनी स्वागत केले.

अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन शुक्रवारी क्वाड देशांच्या पहिल्या परिषदेचे आयोजन करतील. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि जपानचे पंतप्रधान योशीहिडे सुगा हेही या परिषदेत सहभागी होतील. तीन दिवसांच्या या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील.