
संजय राऊत यांचं मुंबई विमानतळावर गुरुवारी जंगी स्वागत झालं. त्यांच्या स्वागतासाठी ढोल ताशे घेऊन शिवसैनिक विमानतळावर दाखल झाले होते. कार्यकर्त्यांच्या गराड्यात असताना संजय राऊत बाहेर आले. यावेळी तोबा गर्दीतून वाट काढत ते मुंबई विमानतळावरुन बाहेर आले होते. यावेळी एका खास क्षणानं कॅमेऱ्यांचं लक्ष वेधलं.

असंख्य कार्यकर्त्यांच्या गराड्यात संजय राऊत यांचे बंधू सुनिल राऊतही मुंबई विमानतळावर हजर होते. मुंबई विमानतळावर आलेल्या कार्यकर्त्यांसोबत सुनिल राऊतही आपल्या भावाला रिसिव्ह करण्यासाठी दाखल झाले होते. यावेळी सुनिल राऊत यांनी संजय राऊत यांचा हातही पकडला. भावाची भावासाठी सुरु असलेली धडपड यावेळी कॅमेऱ्यानं अचूक टिपली.

मुंबई विमानतळावर येताच संजय राऊत यांनी कार्यकर्त्यांना हात उंचावून अभिवादन केलं. यावेळी संजय राऊत यांच्यासाठी शिवसैनिकांची जबरदस्त शक्तिप्रदर्शन केलं. दिल्लीतून संजय राऊत मुंबईत दाखल झाले. त्यावेळी माध्यमांसोबत पोलिस आणि कार्यकर्ते यांची लगबग पाहायला मिळाली.

संजय राऊत यांच्या दादरमधील घरावर ईडीनं कारवाई केली आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या या कारवाईवेळी संजय राऊत हे दिल्ली होते. दिल्लीतून ते गुरुवारी दुपारी मुंबईत दाखल झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी संजय राऊत मुंबई विमानतळावर दाखल होताच एकच जल्लोष केला.

मोठ्या संख्येनं शिवसेनेच्या महिला कार्य़कर्त्यांचीही हजेरी यावेळी मुंबई विमानतळावर पाहायला मिळाली होती. केंद्रीय तपास यंत्रणांच्या विरोधात संजय राऊत यांनी सनसनाटी आरोप केले होते. वादळी पत्रकार परिषदांमधूनही संजय राऊत यांनी भाजपच्या नेत्यांवर गंभीर आरोप केलेले होते. आता ईडीनं कारवाई केल्यानं संजय राऊत हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. दरम्यान, बुधवारी शरद पवार यांनीही मोदींची भेट घेऊन संजय राऊतांवरील कारवाई अन्यायकारक असल्याचं म्हटलं होतं.