Post Office Schemes : पोस्टाच्या या योजनेत 1000 रूपयांपासून करा गुंतवणूक, 5 वर्षात प्रत्येक महिन्याला होईल भरगोस कमाई
नियमित मासिक उत्पन्नासाठी पोस्ट ऑफिसची मंथली इन्कम स्कीम एक पर्याय उत्तम आहे. ती योजना कशी मिळवायची, गुंतवणुकीपूर्वी महत्त्वाचे नियम, व्याजावर कर लागू होणारे कर समजून घ्या

बचत केलेल्या पैशांवर दर महिन्याला ठराविक उत्पन्न मिळावं. अशी अनेकांची इच्छा असते. विशेषत: निवृत्तीनंतर नियमित पैशांची सोय व्हावी. यासाठी अनेक जण सुरक्षित गुंतवणूकीचे पर्याय शोधतात. अशा वेळी पोस्ट ऑफिसची मंथली इन्कम स्कीम हा एक पर्याय आहे. या योजनेत एकरकमी पैसे जमा केल्यानंतर त्यावर दर महिन्याला व्याज मिळतं.
काय आहे पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्किम :पोस्ट ऑफिसची मंथली इन्कम स्किम ही केंद्र सरकारच्या अल्पबचत योजनांपैकी एक आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर पाच वर्षांच्या कालावधीत दर महिन्याला व्याज मिळतं. म्हणजेच प्रत्येक महिन्याला ठराविक उत्पन्न मिळवू इच्छिणाऱ्यांसाठी हा पर्याय आहे. या योजनेत मिळणारा व्याजदर खाते उघडताना लागू असलेल्या दरानुसार निश्चित होतो.
किती पैसे गुंतवता येतात? : या योजनेत किमान 1,000 रूपयांपासून गुंतवणूक करता येते. एका व्यक्तीच्या नावाने खाते उघडल्यास जास्तीत जास्त 9 लाख रूपये जमा करता येतात. तर संयुक्त खात्यात जास्तीत जास्त 15 लाख रूपये गुंतवण्याची मर्यादा आहे. संयुक्त खाते जास्तीत जास्त तीन प्रौढ व्यक्ती मिळून उघडू शकतात.
दरमहा किती व्याज मिळणार :सध्या लागू असलेल्या 7.4 टक्के वार्षिक व्याजदरानुसार, 9 लाख रूपये गुंतवल्यास दरमहा 5,550 रूपये व्याज मिळू शकतं. तर संयुक्त खात्यात 15 लाख रूपये जमा केल्यास दरमहा 9,250 रूपये व्याज मिळू शकतं.
उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीने या योजनेत 9 लाख रूपये गुंतवले, तर त्याला पाच वर्षे दरमहा 5,550 रूपये मिळतील. पाच वर्षांत एकूण 3 लाख 33 हजार रुपये व्याज मिळेल. मुदत पूर्ण झाल्यानंतर मूळ गुंतवलेली 9 लाख रूपयांची रक्कम परत मिळते.
मुदतपूर्व पैसे काढता येतात का? :या योजनेचा कालावधी 5 वर्षाचा आहे. मात्र खाते उघडल्यानंतर पहिल्या वर्षात पैसे काढता येत नाही. 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुदतपूर्व खाते बंद करण्याची सुविधा आहे. मात्र त्यासाठी ठराविक दंड आकारला जातो. 1 ते 3 वर्षांच्या आत खाते बंद केल्यास मूळ रकमेच्या 2 टक्के कपात होते. तीन वर्षांनंतर आणि पाच वर्षांनंतर खाते बंद केल्यास 1 टक्के कपात केली जाते.
व्याजावर कर लागू होतो का? :या योजनेतून मिळणारं व्याज करपात्र असतं. त्यामुळे गुंतवणूकदाराच्या उत्पन्नानुसार त्यावर आयकर लागू होऊ शकतो. तसेच या योजनेत गुंतवणूक करताना आपल्या आर्थिक गरजा, करपात्र उत्पन्न आणि पाच वर्षांच्या कालावाधीचा विचार करणं आवश्यक आहे.