अभिनेता प्रकाश राज यांनी दिल्लीत सीजेपीच्या आंदोलनात ट्रकच्या छतावर उभं राहून काय केलं? पाहा फोटो
अभिनेता प्रकाश राज यांनी दिल्लीतील जंतरमंतर येथे तरुणांच्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. सोनम वांगचुक यांच्या उपोषणानंतर उसळलेल्या जनआक्रोशात ते तरुणांसोबत उभे राहिले. ट्रकाच्या छतावरून त्यांनी सरकार दडपशाही करत असल्याचा निषेध केला आणि संविधानाचे महत्त्व अधोरेखित केले. सामान्य नागरिक बनून त्यांनी तरुणांना बळ दिले, त्यांचा आवाज बनले.

सोनम वांगचुक यांना पोलिसांनी जबरदस्तीने रुग्णालयात दाखल केल्यानंतर आज तरुणांच्या आक्रोशाचा बांध फुटला. संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी तरुणांनी दिल्ली दणाणून सोडली. तरुणांपासून वृद्घांपर्यंत सर्वच जण या आंदोलनात सहभागी झाले होते. नेहमीच सामाजिक मुद्द्यांवर भाष्य करणारे अभिनेते प्रकाश राज तर काल रात्रीपासूनच जंतरमंतरवर ठाण मांडून होते. सामान्य नागरिकांपर्यंत तेही तरुणांचे आवाज बनून उभे होते. सर्व स्टारडम बाजूला ठेवून त्यांनी जनतेच्या आंदोलनात सहभाग घेतला. ज्या ट्रकमध्ये सोनम वांगचुक यांच्या पत्नी आणि आंदोलक होते. त्या ट्रकच्या छतावर प्रकाश राज यांनी उभं राहून तरुणांना बळ देण्याचं प्रयत्न केला. त्यामुळे तरुणांमध्ये उत्साह संचारला होता.

सोनम वांगचुक यांचं उपोषण पोलिसांनी मोडीत काढल्यानंतर कॉकरोच जनता पार्टीचे नेते अभिजीत दीपके यांनी उपोषण सुरू करून सरकारचा निषेध नोंदवला. सरकार दडपशाही करत असल्याचा आरोप अभिजीत दीपके यांनी केला.

सोनम वांगचुक यांचं आंदोलन दडपणं आणि अभिजीत दीपके यांनी उपोषण सुरू करणं यामुळे तरुणांमध्ये आक्रोश उसळला. तरुणांनी जंतरमंतरकडे कूच केली. सर्वच क्षेत्रातील लोक जंतमंतरवर जमले. अभिनेते प्रकाश राजही जंतरमंतरवर आले आणि तरुणांचे आवाज बनले.

प्रकाश राज कालपासूनच जंतरमंतरवर आहेत. साधा टीशर्ट अंगात घालून ते आले आहेत. रात्री ते सामान्य नागरिकांसारखेच स्टेजवर झोपले. कोणताही बडेजाव नाही. स्टारडमचा आव नाही. सामान्य माणसासारखं ते आंदोलक झाले होते.

काल संध्याकाळी त्यांनी तरुणांशी संवाद साधला. सरकारच्या दडपशाहीचा निषेध नोंदवला. आज सकाळाही त्यांनी तरुणांशी संवाद साधला. जेव्हा तरुण आक्रमक झाले तेव्हाही प्रकाश राज तरुणांच्या पाठी होते. तरुणांवर हल्ला न करण्याचं आवाहन करत होते.

सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली वांगचुक घटनास्थळी आल्या. त्यावेळी त्यांनी तरुणांशी संवाद साधला. एका ट्रकवर उभ्या राहून गीतांजली वांगचुक संवाद साधत होत्या. प्रकाश राजही ट्रकवर उभे राहिले. त्यांनी खणखणीत भाषण करून सरकारचा निषेध नोंदवला.

प्रकाश राज यांनी हातात संविधान घेतले होते. संविधानाचं पुस्तक दाखवत त्यांनी दडपशाहीचा निषेध केला. प्रकाश राज यांचा आवेश आणि जोश पाहण्यासारखा होता. त्यांच्या या आवेशामुळे तरुणांनाही जोश भरत होता. त्यांच्या भाषणांना तरुणांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत होता.