CJP Protest: सोनम वांगचूक, कॉक्रोच जनता पार्टीच्या समर्थनार्थ राज्यभरात विद्यार्थी उतरले रस्त्यावर
सोनम वांगचूक आणि कॉक्रोच जनता पार्टीच्या समर्थनार्थ राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात येत आहेत. ठाणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती याठिकाणी ही आंदोलनं झाली आहेत.

छत्रपती संभाजीनगरच्या क्रांतीचौकात विविध पक्ष, संघटना आणि वकील संघाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या दिल्लीतील आंदोलनाच्या समर्थनात क्रांती चौकात विद्यार्थ्यांसह मोठ्या संख्येने आंदोलक जमले आहेत. "अभिजीत दिपके आणि सोनम वांगचूक हे विद्यार्थ्यांसाठी लढत आहेत, मात्र सरकार दखल घेत नाहीये. सरकारने शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला पाहिजे. नीट पेपर फुटीमुळे विद्यार्थी आत्महत्या करत आहेत," असं आंदोलनात सहभागी झालेले विद्यार्थी म्हणत आहेत.

जंतर-मंतर इथं सोनम वांगचूक आणि अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भिवंडीत तरुणाई रस्त्यावर उतरली आहे. भिवंडीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं मोठ्या संख्येनं तरुण सोनम वांगचूग यांना पाठिंबा देत घोषणाबाजी करत आहेत.

नागपुरात कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संविधान चौकात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सोनम वांगचूक यांच्या समर्थनार्थ नागपुरात आज शांतता मार्च आयोजित करण्यात आलं आहे. व्हेरायटी चौकीतील परवानगी नाकारल्यानंतर संविधान चौकात आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दिल्लीत सुरू असलेल्या सोनम वांगचूक आणि सीजेपीचे अध्यक्ष अभिजीत दीपके यांच्या समर्थनात आज परळीत शैक्षणिक बंद पाळला जातोय. सोनम वांगचूक आणि अभिजीत दिपके यांच्या समर्थकांनी आज परळीत शैक्षणिक बंदचं आवाहन केलं आहे.

सोनम वांगचूक यांचं उपोषण दडपशाहीने मोडीत काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या तसंच संसदेवर मोर्चा काढणाऱ्या केंद्र सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आलं.

यावेळी जितेंद्र आव्हाड म्हणाले, "1973 मध्ये बिहारमध्ये आणि गुजरातमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं. ते आंदोलन पेटलं आणि त्यामध्ये इंदिरा गांधींचा पराभव झाला होता. विद्यार्थ्यांवर गोळ्या झाडल्या, लाठीचार्ज केला की काय होतं, हे सबंध चीनने पाहिलं होतं. तुम्ही विद्यार्थ्यांना दाबायला जाऊ नका. एकदा विद्यार्थ्यांच्या डोक्यात आग पसरली, की ते तो कोणीही थांबवू शकत नाही. आज देशभरातील विद्यार्थी एकत्र आले असून, त्यांच्या या चळवळीला कोणाचेही राजकीय पाठबळ नाही, तर ते स्वतःहून एकत्र आले आहेत."

दिल्लीतल्या जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोनानाला जळगावातूनही पाठिंबा मिळतोय. जळगावच्या धरणगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाविकास आघाडीच्या वतीने घोषणाबाजी करत निदर्शनं करण्यात आली. केंद्रीय व राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेसच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली.

दरम्यान, मनोज प्रधान म्हणाले, "आजचं जे आंदोलन आहे, ते खऱ्या अर्थाने अभूतपूर्व आहे. गेल्या 22 दिवसांमध्ये एक फरक पडला आहे की विद्यार्थी आणि लोकं स्वतःहून रस्त्यावर उतरायला लागले आहेत. आज आंदोलन सर्वपक्षीय नेत्यांचं होतं, पण आज इतके विद्यार्थी इथे स्वतःहून आलेले आहेत, ते बघून खरंच बरं वाटलं. म्हणजे आता लोकांना कळायला लागलंय की 12 वर्षे जे ते झेलतायत, त्याच्या विरोधात आता ते गप्प बसणार नाहीत."