White Horse : रंग पांढरा, सोबतीला 100 बॉडीगार्ड, ‘विश्वास’ घोड्याची भारतभर चर्चा; नेमकं खास काय?
विश्वासला पाहण्यासाठी राजस्थानसह इतर भागांतूनही लोक पुष्करमध्ये दाखल होत आहेत. त्याच्यासोबत फोटो काढणे, व्हिडिओ बनवणे आणि सेल्फी घेण्यासाठी पशुशौकीनांची गर्दी होत आहे.

घोड्यावर दौड करणं अनेकांना रोमहर्षक वाटतं. घोडा हा प्राणीदेखील अनेकांना आवडतो. या जगात अनेक धिप्पाड, आकर्षक असे घोडे आहेत. परंतु सध्या एका आगळ्यावेगळ्या घोड्याची सगळीकडे चर्चा आहे. या घोड्याला तब्बल 100 सुरक्षारक्षकांचे संरक्षण आहे.
राजस्थानमधील पुष्कर येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय पशुमेळ्यात 'विश्वास' नावाचा मारवाडी घोडा आकर्षणाचे केंद्र बनला आहे. त्याची लोकप्रियता इतकी आहे की, मेळ्यात त्याची एन्ट्री तब्बल १०० सुरक्षा रक्षकांच्या बंदोबस्तात करण्याची तयारी सुरू आहे. या अनोख्या तयारीमुळे त्याला पाहण्यासाठी लोकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
विश्वास हा काही साधासुधा घोडा नाही. त्याचा रंग पांढराशुभ्र आहे. त्याच्या अंगावर एकही काळा केस नाही. दुधासारखा शुभ्र रंग, उंच बांधा आणि दमदार शरीरयष्टी यामुळे तो गर्दीत सहज लक्ष वेधून घेतो. त्याचा शाही थाट पाहण्यासाठी पशुमेळ्यात येणारे अनेकजण आवर्जून त्याच्याजवळ जात आहेत.
विश्वासला पाहण्यासाठी राजस्थानसह इतर भागांतूनही लोक पुष्करमध्ये दाखल होत आहेत. त्याच्यासोबत फोटो काढणे, व्हिडिओ बनवणे आणि सेल्फी घेण्यासाठी पशुशौकीनांची गर्दी होत आहे. त्याच्या खास वैशिष्ट्यांमुळे मेळ्यातील इतर प्राण्यांच्या तुलनेत त्याची वेगळीच ओळख निर्माण झाली आहे.
दरम्यान, पुष्करचा पशुमेळा देशभरातील पशुपालकांसाठी मोठे आकर्षण असतो. राजस्थानसोबत महाराष्ट्र, पंजाब, गुजरात आणि हरियाणातूनही पशुपालक विविध जातींचे प्राणी घेऊन येथे येतात.
पशूंची खरेदी-विक्री आणि त्यांच्या वैशिष्ट्यांमुळे गाजणाऱ्या या मेळ्यात मारवाडी घोड्यांना विशेष मागणी असून, विश्वासच्या आगमनाने यंदाच्या मेळ्याची रंगत आणखी वाढली आहे.