Red Wine: द्राक्षांपासून बनते तरी रेड वाईन शाकाहारी नसते? निर्मितीची प्रक्रिया वाचून व्हाल थक्क

द्राक्षांपासून तयार होणारी रेड वाईन शाकाहारीच असते असं नाही. वाईन निर्मितीच्या प्रक्रियेत काही असे घटक वापरले जातात, ज्याविषयी जाणून तुम्हीही थक्क व्हाल. जाणून घ्या वाईन निर्मितीमागचं हे रंजक सत्य...

| Updated on: Nov 27, 2026 | 12:23 PM
1 / 7
Red Wine: रेड वाईन म्हटलं की अनेकांच्या डोळ्यांसमोर द्राक्षं, त्यांचा रस आणि त्यापासून तयार होणारं पेय येतं. त्यामुळे द्राक्षांपासून बनणारी वाईन शाकाहारीच असणार, असं अनेकांना वाटतं. मात्र वाईन तयार करण्याच्या प्रक्रियेत काही वेळा अंडी, माशांपासून मिळणारे घडक आणि प्राण्यांपासून तयार केलेल्या जिलेटिनचा वापर केला जातो. त्यामुळे काही रेड वाईन शाकाहारी किंवा व्हेगन नसू शकतात. नेमकं यामागचं काय कारण आहे, ते जाणून घेऊयात..

Red Wine: रेड वाईन म्हटलं की अनेकांच्या डोळ्यांसमोर द्राक्षं, त्यांचा रस आणि त्यापासून तयार होणारं पेय येतं. त्यामुळे द्राक्षांपासून बनणारी वाईन शाकाहारीच असणार, असं अनेकांना वाटतं. मात्र वाईन तयार करण्याच्या प्रक्रियेत काही वेळा अंडी, माशांपासून मिळणारे घडक आणि प्राण्यांपासून तयार केलेल्या जिलेटिनचा वापर केला जातो. त्यामुळे काही रेड वाईन शाकाहारी किंवा व्हेगन नसू शकतात. नेमकं यामागचं काय कारण आहे, ते जाणून घेऊयात..

2 / 7

रेड वाईन तयार करण्यासाठी प्रामुख्याने द्राक्षांचा वापर केला जातो. द्राक्षांचा रस आंबवून म्हणजे फर्मेंटेशन प्रक्रियेद्वार वाईन तयार होते. मात्र त्यानंतर वाईन अधिक स्वच्छ, पारदर्शक आणि चवीला संतुलित करण्यासाठी आणखी एक प्रक्रिया केली जाऊ शकते. तिला 'फायनिंग' (Fining) असं म्हणतात.

3 / 7

या प्रक्रियेत वाईनमधील तरंगणारे सूक्ष्म कण, अतिरिक्त टॅनिन आणि इतर अनावश्यक घटक वेगळे करण्यासाठी विशिष्ट पदार्थ मिसळले जातात. हे पदार्थ त्या कणांना एकत्र आणतात. त्यानंतर ते खाली बसतात आणि गाळण्याच्या प्रक्रियेतून वेगळे केले जातात. त्यामुळे वाईन अधिक स्वच्छ दिसते आणि तिच्या चवीतील काही कडवटपणाही कमी होऊ शकतो.

4 / 7

या प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या काही घटकांची माहिती ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटू शकतं. उदाहरणार्थ, अंड्याच्या पांढऱ्या भागाचा म्हणजेच एग अल्ब्युमिनचा वापर रेड वाईनमधील टॅनिन कमी करण्यासाठी केला जाऊ शकतो. तसंच जिलेटिनचा वापरही वाईन स्वच्छ करण्यासाठी केला जातो. हे जिलेटिन प्राण्यांच्या ऊतींपासून तयार केलेलं असू शकतं.

5 / 7

याशिवाय 'इसिंगग्लास' नावाचा घटकही काही वाईनच्या निर्मितीत वापरला जातो. हा घटक माशांच्या पोहण्याच्या पिशवीपासून मिळवला जातो. प्रामुख्याने व्हाइट वाईनच्या स्वच्छतेसाठी त्याचा वापर केला जातो. दुधापासून मिळणारं केसिन हेदेखील काही वेळा फायनिंगसाठी वापरले जाते.

6 / 7

असं असेल तर मग प्रत्येक रेड वाईन मांसाहारी असते का, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर नाही असं आहे.ही गोष्ट लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. प्रत्येक रेड वाईन तयार करताना अंडी, जिलेटिन किंवा माशांपासून मिळणाऱ्या घटकांचा वापर केला जातोच असं नाही. अनेक उत्पादक वाईन स्वच्छ करण्यासाठी बेंटोनाइट नावाची नैसर्गिक माती, वनस्पतींपासून मिळणारी प्रथिनं किंवा इतर पर्यायी घटक वापरतात.

7 / 7

विशेष म्हणजे, फायनिंग प्रक्रियेत वापरलेले घटक बहुतांश वेळा अंतिम वाईनमधून गाळून वेगळे केले जातात. तरीही निर्मिती प्रक्रियेत प्राणिजन्य घटक वापरले असल्यास ती वाईन व्हेगन मानली जात नाही. त्यामुळे वाईन केवळ द्राक्षांपासून तयार होते म्हणून ती पूर्णपणे शाकाहारी आहे, असा निष्कर्ष काढता येत नाही. तुम्हाला शाकाहारी किंवा व्हेगन वाईन निवडायची असेल, तर बाटलीवरील माहिती तपासा किंवा उत्पादकाकडून निर्मिती प्रक्रियेची खात्री करून घ्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us