EPFO: एक रुपया सुद्धा जमा न करता PF खात्यात किती काळपर्यंत मिळते व्याज? तो नियम काय?
EPFO PF Interest Rate: नोकरी बदलणे अथवा सोडल्यानंतर पीएफ खाते लागलीच निष्क्रिय होत नाही. ईपीएफओच्या नियमानुसार, काही खास अटींवर विना पैसे जमा करता 58 वर्ष वयापर्यंत खात्यात व्याज जमा होते. काय आहे याविषयीचा नियम?

EPFO PF Interest Rate: नोकरी बदलल्यानंतर अथवा स्थलांतरणानंतर अनेक जणांना पीएफ खात्याचा विसर पडतो. अशावेळी तीन वर्षापर्यंत खात्यात नवीन पैसा पडलेले नसताना त्यावरील व्याज बंद होते का? असे अनेकांना वाटते. जर तुम्हालाही असेच वाटत असेल तर ईपीएफओने मोठा दिलासा दिला आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने युट्यूबवर एक व्हिडिओ शेअर करून त्याविषयीची माहिती आणि धोरण स्पष्ट केले आहे. त्यानुसार योगदान थांबले म्हणून खात्यावरील व्याज लागलीच बंद करण्यात येत नाही .
जुन्या खात्यावर कधीपर्यंत मिळते व्याज
ईपीएफओ योजना 1952 मधील कलम 72(6) नुसार तीन वर्षांपर्यंतचा याविषयीचा नियम लागू आहे. जर एखादा कर्मचारी 55 व्या वर्षी नोकरी सोडत असेल तर त्याच्या जुन्या पीएफ खात्यात 58 वर्षांपर्यंत व्याजाची रक्कम मिळते. त्यात मग एक रुपयाही जमा झालेला नसो. जे लोक 55 व्या वर्षी वा त्यानंतर सेवानिवृत्त होतात, त्यांच्यासाठी अखेरचे योगदान 36 महिने म्हणजे तीन वर्षे इतका असतो. म्हणजे एखादी व्यक्ती 58 व्या वर्षी सेवानिवृत्त झाली तर त्याच्या पीएफ खात्यातील रक्कमेवर ती व्यक्ती 61 वर्षांची होईपर्यंत व्याज मिळते. त्यानंतर मात्र व्याजाची रक्कम मिळणार नाही.
तर खाते होते निष्क्रिय
55 व्या वर्षी अथवा त्यापेक्षा कमी वयात निवृत्त झाल्यानंतर 36 महिन्यापर्यंत पैसे न काढल्यास, परदेशात स्थायिक झाल्यास आणि त्यानंतर 36 महिन्यांपर्यंत खात्यात रक्कम जमा न झाल्यास, सदस्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कायदेशीर वारसदरांनी 36 महिन्यांच्या आत दावा केला नाही आणि योग्य कागदपत्रं दाखल केली नाही तर खाते निष्क्रिय होते. तर अजून एका विशेष प्रकरणात खाते निष्क्रिय ठरते. अंतिम दाव्याची रक्कम जर चुकीच्या अथवा बंद खात्यात जमा झाली आणि त्याविषयी 36 महिन्यात कोणतीही तक्रार केली नाही तर खाते निष्क्रिय मानले जाते.
अर्थात खाते निष्क्रिय झाले म्हणजे त्यातील रक्कम ही सरकार दरबारी जमा होते असे नाही. कायदेशीर वारस योग्य ती प्रक्रिया पूर्ण करून अथवा योग्य कागदपत्रं सादर करून पैसे परत मिळवू शकतात. त्यासाठी विविध अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागते. पूर्ण रक्कम काढण्यासाठी वारसाला फॉर्म 19, जुने पीएफ खाते नवीन पीएफ खात्यात हस्तांतरीत करण्यासाठी फॉर्म 13, तर मृत सदस्याच्या पीएफ रक्कमेवर दावा करण्यासाठी फॉर्म 20 सादर करावा लागतो.
