पाकिस्तानी गायिकेने गायलेलं 43 वर्ष जुनं Sad Song भारतीय चित्रपाटात तुफान गाजलं आजही ऐकताना…
रेशमा यांच्या आवाजाने भारत आणि पाकिस्तानमधील संगीतप्रेमींची मने जिंकली होती. त्यांच्या आवाजातील वेदना आणि भावनिकता आजही श्रोत्यांना मंत्रमुग्ध करते. 1983 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हीरो' चित्रपटातील 'लंबी जुदाई' हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले. मात्र, या गाण्याच्या लोकप्रियतेसोबतच रेशमा यांच्या आयुष्यातील काही रंजक गोष्टीही जाणून घेण्यासारख्या आहेत.

रेशमा यांचा जन्म 1 जानेवारी 1947 रोजी राजस्थानमधील बिकानेरजवळील लोहा गावात झाला. त्यांचा जन्म एका बंजारा कुटुंबात झाला होता. भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी त्यांचे कुटुंब पाकिस्तानमध्ये गेले, तेव्हा त्या अवघ्या 1 महिन्याच्या होत्या.
पाकिस्तानमध्ये स्थायिक झाल्यानंतर रेशमा यांचे कुटुंब कराचीमध्ये राहू लागले. लहान वयातच त्यांनी गाण्यास सुरुवात केली होती. त्या दर्ग्यांमध्ये जाऊन सूफी गीते गायच्या.
रेशमा यांच्या आवाजाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते. वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षी पाकिस्तानी रेडिओ आणि टीव्ही निर्माते सलीम गिलानी यांनी त्यांच्यातील गायनकला ओळखली. त्यांनी रेशमा यांना आपली कला सादर करण्याची संधी दिली.
1968 मध्ये रेशमा यांनी रेडिओ पाकिस्तानसाठी 'लाल मेरी पत रखियो…' हे गाणे गायले. या गाण्यामुळे त्यांना मोठी लोकप्रियता मिळाली. त्यानंतर त्या सूफी गायिका म्हणून प्रसिद्ध झाल्या.
1983 मधील 'हीरो' चित्रपटातील 'लंबी जुदाई' हे गाणे त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा ठरले. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील श्रोत्यांनी त्यांच्या आवाजाला भरभरून प्रेम दिले. आजही हे गाणे ऐकल्यावर अनेकांच्या जुन्या आठवणी जाग्या होतात.