Diwali Health Tips: फटाक्यांची आतषबाजी पाहताना सावधान! ‘या’ आजारांच्या रुग्णांसाठी धूर ठरू शकतो धोकादायक; कुणी विशेष काळजी घ्यावी?
Hidden Health Risks of Diwali Firecrackers: दिवाळीचा आनंद आरोग्यावर बेतू शकतो. काही रुग्णांसाठी धुराचा त्रास गंभीर ठरू शकतो. यामुळे विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.

दिवाळीत फटाके फोडण्याचा आणि आतषबाजी पाहण्याचा उत्साह सर्वत्र दिसून येतो. मात्र या फटाक्यांमधून निघणारा धूर आरोग्यासाठी हानिकारक ठरतो. फटाक्यांच्या धुरातील सूक्ष्म कण आणि हानिकारक वायू श्वसनसंस्थेमार्फत शरीरात प्रवेश करतात आणि फुफ्फुसे व हृदयावर परिणाम करतात. काही लोकांसाठी याचे परिणाम अधिक गंभीर असतात. त्यामुळे या पाच प्रकारच्या लोकांनी दिवाळीत फटाके वापरताना विशेष खबरदारी घेतली पाहिजे.
दमा, ब्राँकायटिस किंवा सीओपीडी यांसारखे दीर्घकालीन वैद्यकीय आजार असलेल्या लोकांनी फटाक्यांच्या धुरापासून दूर राहावे. धुरातील प्रदूषकांमुळे श्वसनमार्गातील जळजळ आणि सूज वाढते. ज्यामुळे खोकला, छातीत जडपणा आणि श्वास घेण्यास त्रास होतो. काही प्रकरणांमध्ये दम्याचा झटका देखील येऊ शकतो. अशा आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांनी ज्या ठिकाणी फटाके फोडले जात आहेत, ती ठिकाणे टाळावीत.
गर्भवती महिलांनाही फटाक्यांच्या धुरापासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. प्रदूषक आणि काही जड धातूंचा संपर्क वाढत्या गर्भासाठी हानिकारक मानला जातो. त्याचबरोबर लहान मुलांची फुफ्फुसे अजून विकसित होत असतात आणि ते वेगाने श्वास घेतात. ज्यामुळे ते प्रदूषणाच्या सूक्ष्म कणांच्या संपर्कात येतात. या धुरामुळे मुलांना खोकला, घशात खवखव आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. त्यामुळे मुलांना फटाक्यांच्या ठिकाणांपासून दूर ठेवा.
फटाक्यांमधून बाहेर पडणारे पीएम 2.5 आणि पीएम 10 सारखे सूक्ष्म कण हृदयरुग्णांसाठीही समस्या निर्माण करतात. या कणांच्या संपर्कात आल्याने शरीरात दाह निर्माण होऊ शकतो. रक्तदाब वाढू शकतो. गंभीर प्रकरणांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याचा धोकाही वाढू शकतो. वृद्ध व्यक्तींनीही धुराबाबत सावधगिरी बाळगली पाहिजे. कारण वाढत्या वयानुसार फुफ्फुसांची कार्यक्षमता आणि प्रतिकारशक्ती कमकुवत होते. ज्यामुळे त्यांना श्वसनाच्या समस्यांचा धोका निर्माण होतो.
दिवाळीच्या काळात तुमच्या खिडक्या आणि दारे बंद ठेवा. शक्य असल्यास तुमच्या खोलीत एअर प्युरिफायरचा वापर करा. ज्या ठिकाणी फटाके फोडले जात आहेत. अशा ठिकाणी जाणे आणि धुरामध्ये जास्त वेळ घालवणे टाळा. जर तुम्हाला बाहेर जावेच लागले, तर व्यवस्थित बसणारा N95 मास्क वापरा. तो पूर्ण संरक्षण देत नाही. श्वास घेण्यास त्रास होत असल्यास किंवा छातीत दुखत असल्यास, ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.
