
82 वर्षीय सदानंद विष्णू करंदीकर यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाला 10 लाखांची देणगी दिली आहे. तर पंतप्रधान सहायता निधी कक्षाला 10 लाख रुपये अशी एकूण 20 लाखांची देणगी दिली आहे.

सदानंद करंदीकर हे खाजगी कंपनीतून निवृत्त झाले आहेत. अपत्य नसल्याने शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या श्रीमती सुमती करंदीकर या आपल्या पत्नीसह ते नेरुळमधील आनंद वृद्धाश्रमात रहायला गेले होते.

गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये त्यांच्या पत्नीचा कर्करोगाने मृत्यू झाला. कर्करोगग्रस्तांच्या नातेवाईकांची धावपळ आणि पैशाअभावी धडपड त्यांनी जवळून पाहिली.

त्यामुळे पत्नीच्या स्मरणार्थ त्यांनी देणगी देण्याचा निर्णय घेतला. अध्यात्म, देवभक्ती आणि शेतीत रस असलेल्या सदानंद करंदीकर यांनी आज मुख्यमंत्री सहायता निधीला 10 लाख आणि पंतप्रधान सहायता निधीला 10 लाख असा 20 लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला.

सदानंद करंदीकर हे 82 वर्षांचे आहेत. आज सकाळी डोंबिवलीतून त्यांनी लोकल पकडली आणि बसचा प्रवास करुन ते मंत्रालयात आले.

ते मूळचे कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचरा गावचे आहेत. सध्या ते त्यांची बहीण प्रभा श्रीराम शितूत यांच्याकडे राहतात.