
वैष्णवांच्या अपार भक्तीचा सोहळा, गळ्यात तुळशीची माळ अन् मुखी विठ्ठलाचं नाव.. असं दृश्य म्हणजे वारी. पंढरपूरची वारी ही महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा आहे. या वारीमध्ये ईश्वरप्रेमाची विलक्षण अनुभूती होते.

नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' या चित्रपटात आर्चीची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रिंकू राजगुरू नुकतीच आषाढी वारीमध्ये सहभागी झाली. रिंकूचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

वारीत सहभागी होऊन रिंकूने श्रद्धेनं पालखी सोहळ्याचं दर्शन घेतलं. यावेळी ती वारकऱ्यांसोबत भजन-गायनातही सहभागी झाली. वारकऱ्यांसोबत रिंकू फुगडीही खेळली. वारीचा एक वेगळाच अध्यात्मिक अनुभव तिने घेतला.

पारंपरिक पोशाखात, भक्तिभावाच्या वातावरणात रिंकूचा हा सहभाग सर्वांनाच भावला. ईश्वरी प्रेमाची विलक्षण अनुभूती घेण्याची संधी म्हणजे वारी. हाच अनुभव रिंकू राजगुरूने घेतला.

हरिनामाचा गजर करत दर्शनासाठी आतुरलेला वारकरी आणि लाखोंच्या संख्येने होणारा टाळमृदंगाचा नाद अशा भक्तिमय वातावरणात गेली कित्येक वर्षे पंढरपूरची वारी अविरतपणे सुरू आहे. सर्वसामान्य वारकऱ्यांसोबत सेलिब्रिटीही या वारीत सहभागी होतात.

पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणीचं दर्शन घेण्यासाठी वारीच्या माध्यमातून लाखो वारकरी राज्यभरातून जातात. वारकऱ्यांसाठी ही वारी म्हणजे जणू एक उत्सवच असतो. विठ्ठलाप्रती मनोभावे केलेली उपासना असते. नाचत, गाजत, खेळत हे वारकरी दिंडीत सहभागी होतात.