फुलांवर जीवापाड प्रेम, समुद्राची विशेष ओढ; संचिता उगलेच्या सोशल मीडियावरून समोर आल्या खास आठवणी
अभिनेत्री संचिता उगले ही सर्वात चर्चेत असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक होती. तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. तिने छावा चित्रपटात देखील खास भूमिका केली आहे.

लोकप्रिय अभिनेत्री संचिता उगलेच्या निधनाच्या वृत्ताने मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे. छोट्या पडद्यावरील आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या संचिताने अल्पावधीतच विशेष लोकप्रियता मिळवली होती.

तिच्या अकाली निधनामुळे चाहते आणि सहकलाकार हळहळ व्यक्त करत असताना, तिच्या सोशल मीडिया पोस्टमधून तिच्या व्यक्तिमत्त्वाचा एक वेगळाच पैलू समोर आला आहे.

संचिता उगले सोशल मीडियावर खूप सक्रिय होती. तिचे इंस्टाग्राम अकाउंटवर मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. तिने शेअर केलेल्या फोटोंवर नजर टाकली असता तिला निसर्ग, समुद्र, फुलं आणि प्रवासाची विशेष आवड असल्याचे स्पष्टपणे दिसून येते.

तिच्या अनेक फोटोंमध्ये ती हातात फुलं धरलेली, केसांमध्ये फुलं लावलेली किंवा फुलांनी सजलेल्या परिसरात फोटोशूट करताना दिसत आहे. फुलांबद्दलचे प्रेम तिने अनेक पोस्टच्या कॅप्शनमधूनही व्यक्त केले होते.

संचिताच्या सोशल मीडिया प्रोफाइलवर फुलांचे विशेष स्थान होते. कधी ती फुलांना दागिन्यांप्रमाणे परिधान करताना दिसत तर कधी केसांमध्ये गजरा किंवा फुलांची सजावट करून फोटो शेअर करत असत.