
अश्वांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या सारंगखेडाच्या यात्रेत यंदा तब्बल 756 अश्वांची विक्री झाली असून त्यातून थोडीथोडकी नव्हे तर 4 कोटीं पेक्षा जास्त उलाढाला झाली आहे. सारंगखेडाच्या घोडेबाजारात यावर्षी सर्वाधिक घोडे दक्षिण भारतातील व्यापाऱ्यांनी घेतले आहेत.

दक्षिण भारतातील तामिळनाडूच्या उटी, कर्नाटकातील बेंगलोरु येथून व्यापारी येऊन सर्वाधिक घोडे घेऊन गेले आहेत. सारंगखेडा येथे सर्व जातीचे आणि सर्वात स्वस्त घोडे मिळत असतात, यासाठी दक्षिण भारतातील व्यापारी सारंगखेड्याच्या यात्रेला येऊ लागले आहेत.

सारंगखेड्याची यात्रा ही देशात सर्वात मोठी घोडेबाजारांसाठी प्रसिद्ध यात्रा आहे. या यात्रेत जातीवंत आणि उमदे घोडे विक्रीसाठी येत असतात तर देशातील विविध राज्यातून घोडे मालक आपले घोडे विक्रीसाठी आणि खरेदीसाठी इथे येतात, त्यामुळे सारंगखेडा यात्रा संपूर्ण भारतात प्रसिद्ध झाली आहे.

विशेष म्हणजे या यात्रेत व्यवस्थित सुविधा मिळत असतात, कोणत्याही व्यापाऱ्याला कुठलाही त्रास होत नाही. त्यामुळे सर्वाधिक घोडे व्यापारी सरंगखेड्याच्या यात्रेत येत असतात.

यंदा 3 हजारपेक्षा अधिक घोडे या यात्रेत दाखल झाले होते, त्यापैकी 756 घोड्यांची विक्री झाली असून तब्बल 4 कोटी 24 लाख 40 हजार 500 रुपयांची उलाढाल झाली आहे.

यात्रा आता शेवटच्या टप्प्यात आली असल्याने ही आर्थिक उलाढाल पाच कोटी रुपयांचा टप्पा पार करेल असा आयोजकांना विश्वास आहे.