
पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे.

या मुसळधार पावसामुळे जिल्हा प्रशासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्ह्यातील सर्व प्रमुख पर्यटनस्थळे 20 जून ते 19 ऑगस्ट या दोन महिन्यांच्या कालावधीसाठी बंद ठेवण्याचे आदेश लागू करण्यात आले आहेत.

जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी या संदर्भात एक परिपत्रक जारी केले असून, या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे.

या दोन महिन्यांच्या कालावधीत अनेक पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत.

यात अजिंक्यतारा किल्ला, ठोसेघर धबधबा,केळवली सांडवली धबधबा, वजराई धबधबा, कासपुष्प पठार, एकीव धबधबा, कास तलाव , बामनोली, सडा वाघापूर उलटा धबधबा, ओझर्डे धबधबा, घाटमाथा धबधबा,लिंगमळा धबधबा यांचा समावेश असेल.

महाबळेश्वर आणि पाचगणी पर्यटन स्थळांवर पावसाळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. त्यामुळे संभाव्य धोके टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

पर्यटकांनी प्रशासनाच्या या आदेशाचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.