
मे महिन्यातील दमदार पावसानंतर आता कोकणातील धबधबे प्रवाहित झाले आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोकणमधील अनेक धबधबे वाहू लागले आहेत. त्यामुळे पर्यटकांची गर्दी सुरु झाली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गाजवळ सवतकडा धबधब्याचे मोहक रुप जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पर्यटकांना पाहण्यास मिळत आहे. आता सवतकडा धबधब्यावर अनेक पर्यटकांनी गर्दी केली आहे.

सवतकडा धबधब्यावर स्लेट टाइप दगडामुळे दोन टप्पे तयार होतात. त्यावर पडणारे पाणी आणि त्याचे सौंदर्य पर्यटकांना मोहीत करते. हा संपूर्ण भाग डोंगर दऱ्यांचा असल्याने एकाच ओढ्यावर ३-४ ठिकाणी छोटे मोठे धबधबे आढळतात.

सवतकडा धबधब्याची उंची सुमारे एक हजार फूट आहे. निसर्गाचे वरदान लाभलेल्या या भागाला भेट देण्यासाठी आता दूरदूरवरील पर्यटक येऊ लागले आहेत. धबधब्याचे विहिंग दृष्य आपल्या नजरेत कैद करत आहे.

कोकणातील स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धबधब्यांमुळे कोकणातील सौदर्यांला वेगळा साज आला आहे. जून महिन्यापासून ते अगदी गणपती, दिवाळीपर्यंत या ठिकाणी पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते.