
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधत रायगड इथं आयोजित करण्यात आलेल्या अभ्यास सहलीतून इतिहास, मूल्ये आणि सामाजिक भान यांचा प्रभावी संगम ‘कमळी’ या मालिकेतून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. या निमित्ताने मालिकाविश्वात प्रथमच एखाद्या मालिकेचं शूटिंग गड-किल्ल्यावर होत आहे.

कमळीने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी 'किल्ले रायगडावर' अभ्यास सहलीच आयोजन केलं आहे. ही केवळ सहल न राहता स्वराज्याच्या विचारांशी पुन्हा एकदा जोडणारी जागृती मोहीम ठरणार आहे. कॉलेजचे विद्यार्थी कमळीच्या पुढाकारातून राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचा उद्देश गडदर्शनापुरता मर्यादित न ठेवता इतिहास समजून घेणं, जबाबदारीची जाणीव निर्माण करणं आणि तरुणाईला सकारात्मक दिशेनं प्रेरित करणं या दृष्टीने बघत आहेत.

या सहलीदरम्यान रायगडावरील प्रत्येक ऐतिहासिक स्थळाचं महत्त्व सविस्तरपणे समजावून सांगण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडाची राजधानी म्हणून केलेली निवड, 1674 साली पार पडलेला राज्याभिषेक सोहळा, गडाची भौगोलिक रचना आणि मजबूत संरक्षण व्यवस्था याविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. या प्रवासातून श्रमदान, सहकार्य आणि शिस्त यांचं मोल ठळकपणे अधोरेखित झालं.

या अभ्यास सहलीचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे गडसंवर्धन आणि स्वच्छतेसाठी करण्यात आलेलं श्रमदान. विद्यार्थ्यांनी गडावरील कचरा गोळा करणं, पाण्याच्या साठ्यांची स्वच्छता करणं आणि परिसर स्वच्छ ठेवण्याची शपथ घेतली. “गडकिल्ले ही आपली जबाबदारी आहे” हा संदेश या कृतीतून देण्यात आला. आधुनिक सुविधा नसतानाही छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं स्वप्न साकारलं, ही जाणीव विद्यार्थ्यांच्या मनात अधिक ठामपणे रुजली.

"रायगडावर शूट करणं आमच्या सर्वांसाठी खरोखर भाग्याची गोष्ट होती. महाराजांच्या कर्मभूमीवर जाऊन काम करण्याची ही मुळातच माझी पहिली वेळ होती, त्यामुळे रायगडावर जाणं आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि तितकीच आदरपूर्वक जबाबदारीची भावना देणारं होतं," असं कमळी साकारणारी विजया बाबर म्हणाली.

"रायगडावर शूट करताना खूप आनंद झाला. तिथे अनेक गोष्टी प्रत्यक्ष पाहायला आणि शिकायला मिळाल्या. आम्ही सतत एकाच विचारात होतो, ज्या वास्तूंवर एकेकाळी महाराज वावरले असतील, त्याच वास्तूंवर आज आपण वावरतो आहोत, याहून मोठी आणि अभिमानाची गोष्ट आमच्यासाठी दुसरी नव्हती. ‘कमळी’ ही रायगडावर शूट करणारी पहिली मालिका आहे," असं तिने पुढे सांगितलं.

"किल्ल्यावर आम्हाला लोकांचा प्रतिसाद प्रत्यक्ष अनुभवायला मिळाला, विशेषतः लहान मुलांमध्ये. आपल्या मालिकेचा प्रभाव लोकांवर आणि लहान मुलांवर किती सुंदर संस्कार करत आहे, हे पाहून खूप समाधान वाटलं. त्या दिवशी अनेक शाळांच्या सहली आल्या होत्या. त्यांना ‘कमळी’ मालिका खूप आवडते आणि मालिकेत ज्या पद्धतीने महाराजांचे विचार मांडले जातात, तेही त्यांना भावतात असं त्यांनी व्यक्त केलं," असा अनुभव विजयाने सांगितला.