
युवराज सिंगने टी20 वर्ल्डकप 2007 मध्ये मारलेले सलग 6 षटकार, वनडे वर्ल्डकप 2011 मधील खेळी कोणच विसरू शकत नही. वनडे वर्ल्डकपमध्ये त्याने पाचव्या क्रमांकावर खेळत 362 धावा केल्या होत्या आणि संघाला वारंवार संकटातून बाहेर काढलं होतं. युवराज सिंग हा खऱ्या अर्थाने टीम इंडियाचा संकटमोचक होता.

शिवम दुबेच्या खेळीमुळे युवराज सिंग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शिवम दुबेच्या खेळीत अनेकांना युवराज सिंगची शैली दिसन येत आहे. त्याला कारणंही तसेच आहे. अफगाणिस्तानविरुद्ध सलग दोन अर्धशतकं आणि दोन गडी टिपल्याने त्याच्याकडे याच नजरेनं पाहिलं जात आहे,

शिवम दुबे हा भविष्यातील युवराज सिंग असल्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरुआहे. असं असताना खुद्द युवराज सिंग याने याबाबत मोठा खुलासा केला आहे. युवराज सिंगने आपला उत्तराधिकारी म्हणून दुसऱ्याच खेळाडूची निवड केली आहे. युवराजने माझ्यासारखे सर्व गुण त्या खेळाडूत असल्याचं सांगितलं आहे.

रिंकू सिंह भविष्यातील युवराज सिंग होऊ शकतो, असं खुद्द युवराजने सांगितलं आहे. डावखुरा फलंदाजाला कधी आक्रमक खेळायचं आणि स्ट्राईकबाबत बऱ्यापैकी माहिती आहे. रिंकू सिंहला खेळताना पाहतो तेव्हा मला माझा खेळ आठवतो असंही युवराज सिंग म्हणाला.

दडपणाखाली खेळायचं कसं आणि तणाव कसा दूर करायचा याचं कौशल्य रिंकू सिंहकडे आहे. खरं तर माझ्याकडे असलेली सर्व कौशल्ये त्याच्याकडे आहेत. त्यामुळे टीम इंडियाने पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर त्याचा फिनिशर म्हणून वापर करावा, अशी इच्छा युवराज सिंग याने व्यक्त केली आहे.

युवराज सिंग 2011 वनडे वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाकडून पाचव्या क्रमांकावर खेळला होता. या स्पर्धेत त्याने 362 धावा केल्या होत्या. तसेच टीम इंडियाला जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. रिंकू सिंहमध्ये अशीच भूमिका हाताळण्याची क्षमता असल्याचं युवराज सिंगने सांगितलं.