
विक्रमादित्य सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) नावावर असंख्य रेकॉर्ड्स आहेत. यातीलच एक 23 वर्षांपूर्वी बनलेला रेकॉर्ड आज तुटणार होता. वाढदिवसा दिवशी सर्वाधिक धावा ठोकण्याचा सचिनचा रेकॉर्ड आयर्लंडची 16 वर्षीय फलंदाज एमी हंटर (Amy Hunter) ही कमाल करणार होती. पण ती काही धावा दूर राहिल्याने हा रेकॉर्ड तोडू शकली नाही.

आयर्लंडची युवा स्टार क्रिकेटपटू एमी हंटरने E झिम्बाब्वेच्या महिला संघाविरुद्धच्या सामन्यात अप्रतिम शतकीय डाव खेळला. तिने 8 चौकार लगावत 121 धावा ठोकल्या. विशेष म्हणजे आजच तिचा वाढदिवस देखील होता. त्यामुळे वाढदिवसादिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात सर्वाधिक धावा ठोकण्याचा रेकॉर्ड ती करेलच असे वाटत होते. पण ती थोडक्यात हुकली.

सचिन तेंडुलकरने 1998 मध्ये त्याच्या वाढदिवसादिवशी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 134 धावांची अप्रतिम खेळी केली होती. हा स्कोर आतापर्यत वाढदिवसादिवशी खेळाडूने केलेला सर्वाधिक स्कोर आहे. दरम्यान एमि 121 धावाच करु शकल्याने ती या रेकॉर्डपासून 14 धावा दूर राहिली.

या वाढदिवसादिवशी सर्वाधिक धा ठोकण्याच्या शर्यतीत आणखीही काही फलंदाज आहेत. यामध्ये सचिननंतर न्यूझीलंडच्या रॉस टेलर याचा नंबर लागतो. त्याने 2011 मध्ये 131 धावा केल्या होत्या. तर त्यानंतर श्रीलंकेच्या सनथ जयसूर्याचा नंबर लागतो. त्याने 2008 साली 130 धावांची खेळी केली होती.