
भारताने उपांत्य फेरीच्या सामन्यात बांग्लादेशला 10 गडी राखून पराभूत केलं आणि अंतिम फेरी गाठली. आता टीम इंडियाचा सामना श्रीलंकेशी होणार आहे. भारताने नवव्यांदा आशिया कप स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे.

बांग्लादेशने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय फसला आणि संपूर्ण संघ 80 धावांवर बाद झाला. विजयासाठी मिळालेलं सोप आव्हान भारताने एकही गडी न गमवता 11 व्या षटकात पूर्ण केलं. या सामन्यात स्मृती मंधानाने 39 चेंडूत नाबाद 55 धावांची खेळी केली. यात 9 चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे.

स्मृती मंधानाने नाबाद 55 धावांची खेळी करताच एका विक्रमाला गवसणी घातली आहे. टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी भारतीय होण्याचा मान मिळवला आहे. यापूर्वी हा विक्रम कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नावावर होता. अर्थात हरमनप्रीत कौर आणि तिच्यात या स्थानासाठी तूल्यबळ लढत असेल.

सामन्यापूर्वी हरमनप्रीत कौर भारतासाठी टी20 मध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू होती. आता या यादीत स्मृती मंधाना पहिल्या क्रमांकावर आली आहे. स्मृती मंधानाने 140 सामन्यात 3433 धावा केल्या आहेत तर हरमनप्रीत कौरने 172 सामन्यात 3415 धावा केल्या आहेत.

वुमन्स आशिया कप टी20 मध्ये 400 धावा पूर्ण करणारी स्मृती मंधाना तिसरी भारतीय खेळाडू ठरली. यापूर्वी हा मान भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर (560) आणि मिताली राज (430) यांना मिळाला आहे. आता स्मृती त्यांच्या पंगतीत जाऊन बसली आहे.