
टीम इंडिया नववर्ष 2024 सालच्या क्रिकेटची सुरुवात दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्याने करणार आहे. मालिकेतील हा दुसरा सामना असला तरी नववर्षातील पहिला सामना आहे. या मालिकेत दक्षिण अफ्रिकेने 1-0 ने आघाडी घेतली आहे. तर दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडिया कमबॅकच्या प्रयत्नात असेल. तर विराट कोहली या सामन्यातून एक खास विक्रम करण्याची शक्यता आहे. यासोबत या वर्षात काही विक्रम तो आपल्या नावावर करू शकतो.

विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत अर्धशतक झळकावले तर सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी करेल. सचिनने दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया या देशांविरोधात सर्वाधिक 50+ धावा करण्याच्या विक्रम केला आहे. सचिनने SENA देशांविरोधात 74 वेळा 50+ स्कोअर केला आहे. तर कोहली 73 वेळा 50+ स्कोअर करत दुसऱ्या स्थानावर आहे.

विराट कोहलीला वनडेत 14000 धावा पूर्ण करण्यासाठी फक्त 152 धावांची गरज आहे. पण जवळपास कोणत्याच वनडे मालिका नाहीत. तसेच तो वनडे खेळेल की नाही याबाबतही साशंकता आहे. कारण दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत विराट खेळला नव्हता.

टी20 क्रिकेटमध्ये 12000 धावा करणारा पहिला भारतीय बनण्यासाठी विराट कोहलीला फक्त 35 धावांची गरज आहे. यासह ख्रिस गेल, शोएब मलिक आणि किरन पोलार्ड यांच्यानंतर असा विक्रम करणारा चौथा फलंदाज ठरणार आहे. पण विराट कोहली अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत खेळणार का? हा देखील प्रश्न आहे.

विराट कोहलीला इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज होण्यासाठी फक्त 544 धावांची गरज आहे. या यादीत सचिन तेंडुलकर 2535 धावांसह पहिल्या क्रमांकावर आहेत. इंग्लंडचा संघ भारतात येणार असून पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.

इंग्लंडविरुद्ध भारतीय फलंदाजाने केलेल्या सर्वाधिक धावांचा विक्रम मोडण्यासाठी कोहलीला फक्त 21 धावांची गरज आहे.

इंग्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4000 धावा पूर्ण करणारा पहिला भारतीय फलंदाज बनण्यासाठी विराट कोहलीला फक्त 30 धावांची गरज आहे.

मायदेशात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके करणारा फलंदाज होण्यासाठी कोहलीला 5 शतकं ठोकावी लागतील. या यादीत 42 शतकं करणारा सचिन तेंडुलकर अव्वल स्थानावर आहे.

विराट कोहलीला वेस्ट इंडिजमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा बनवण्यासाठी 322 धावांची गरज आहे. या यादीत राहुल द्रविड 1919 धावंसह अव्वल स्थानावर आहे. टी20 वर्ल्डकप अमेरिका वेस्ट इंडिजमध्ये आहे. त्यामुळे हा विक्रम आपल्या नावावर करण्याची एक संधी आहे.

किंग कोहलीने न्यूझीलंडविरुद्ध एक शतक झळकावताच सचिनचा एक विक्रम नावावर होईल.सध्या विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर यांनी प्रत्येकी नऊ शतकांसह संयुक्तिकरित्या पहिल्या स्थानावर आहेत.

बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होण्यासाठी विराट कोहलीला 383 धावांची गरज आहे. या यादीत सचिन तेंडुलकर 820 धावांसह पहिल्या स्थानावर आहे.