
आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी रंगत वाढली आहे. मेगा लिलावात चांगले खेळाडू खेचून घेण्यासाठी संघ मालकांची रस्सीखेच सुरु झाली आहे. कोणाला रिटेन करायचं आणि कोणालं रिलीज याची खलबतं सुरु आहेत. बीसीसीआयने अद्याप रिटेंशन नितीची घोषणा केलेली नाही. तरीही संघांनी रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे.

केएल राहुल लखनौ सुपर जायंट्सची साथ सोडणार अशी चर्चा रंगली आहे. मागच्या पर्वात लखनौचे मालक संजीव गोयंका आणि केएल राहुल यांच्यात काही खटके उडाले होते. त्यानंतर वेगवेगळ्या चर्चा रंगल्या होत्या. असं असताना एक अपडेट समोर आलं आहे.

क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, आयपीएलमध्ये खेळाडूंना रिटेन करण्याच्या चर्चेसाठी लखनौचा कर्णधार केएल राहुल कोलकात्याला गेला होता. तिथे संघ मालक संजीव गोयंका यांच्याशी चर्चा झाली. ही चर्चा जवळपास एक तास चालली. या बैठकीत रिटेंशनबाबत चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. इतकंच काय केएल राहुलला संघात ठेवण्यासाठी फ्रेंचायसी सकारात्मक आहे.

आयपीएल 2024 स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादकडून पराभव झाल्यानंतर केएल राहुल आणि संजीव गोयंका यांच्या पहिली औपचारिक चर्चा आहे. 8 मे रोजी पराभवानंतर गोयंका डगआऊटजवळ आक्रमकपणे बोलताना दिसले होते. त्यानंतर बरीच टीका झाली होती. या वादावर पडदा टाकण्यासाठी संजीव गोयंका यांनी केएल राहुलला डिनरसाठी बोलवलं होतं.

केएल राहुलने आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. 132 सामन्यात 4683 धावा केल्या आहेत. मागच्या पर्वातील 14 सामन्यात 520 धावा केल्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 136 पेक्षा जास्त होता. तसेच 4 अर्धशतकं ठोकली होती.