
वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील हायव्होल्टेज सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. भारत पाकिस्तान हे प्रतिस्पर्धी संघ आमनेसामने येणार आहेत. 14 ऑक्टोबरला हा सामना असून अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत.

हायव्होल्टेज सामन्यापूर्वी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने पत्रकार परिषद घेतली. तसेच आम्ही या सामन्यासाठी सज्ज आहोत. हैदराबादमध्ये चाहत्यांनी जसा पाठिंबा दिला. तशीच साथ आम्हाला अहमदाबादमध्ये मिळेल, असं त्याने सांगितलं.

भारताचा वनडे वर्ल्डकपमधील रेकॉर्ड चांगला आहे. यावर बोलताना बाबर म्हणाला भूतकाळ हा भूतकाळ असतो. आम्ही आता काय आहे त्यावर लक्ष केंद्रीत करत आहोत. यावेळीही आमचे बरेच चाहते येतील अशी आशा आहे.

आमच्या चाहत्यांसमोर चांगली कामगिरी करण्याची उत्तम संधी आहे. पहिल्या 10 षटकात विकेट वेगळी असेल. त्यानंतर पुढच्या 10 षटकात चित्र वेगळं दिसेल. त्यानुसार आम्ही योजना आखू, असं बाबर आझम म्हणाला.

नसीम शाह नसल्याने आमची थोडी अडचण झाली आहे. पण शाहीन आफ्रिदी सर्वोत्तम गोलंदाज आहे. त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. आम्ही दबावात खेळणार नाही. आम्ही भारताविरुद्ध बरेच सामने खेळलो आहोत.

2021 मध्ये आम्ही टी-20 विश्वचषकात भारताचा पराभव केला. आम्हाला विश्वास आहे की आम्ही ते येथे देखील करू शकतो. या विश्वचषकात मी जास्त धावा केल्या नाहीत. मला आशा आहे की भारताविरुद्ध बदल होईल.

भारत-पाकिस्तान सामना सुरू होण्यापूर्वी देशातील स्टार कलाकारांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दुपारी 12.30 वाजता कार्यक्रम सुरू होईल. नाणेफेक दुपारी दीड वाजता होईल आणि दुपारी दोन वाजता सामना सुरू होईल. हा सामना पाहण्यासाठी देशातील अनेक मोठे कलाकार आणि राजकारणीही पोहोचणार आहेत.