
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पहिल्या दिवसापासून ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व दिसून आलं. या सामन्यात ऑस्ट्रेलियाला सहज विजय मिळेल असं दिसत असताना रहाणे आणि ठाकुर जोडीने चांगली फलंदाजी केली. मात्र असं असलं तरी ऑस्ट्रेलियाकडे मजबूत आघाडी आहे.

भारताचे आघाडीचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले असताना अजिंक्य रहाणेनं चांगली फलंदाजी केली. ऑस्ट्रेलियन माऱ्याचा जबरदस्त सामना केला आणि कसोटी कारकिर्दितलं 26 वं अर्धशतक ठोकलं.


रहाणेने कसोटी क्रिकेटमध्येही 5 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. केपटाऊनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटची कसोटी खेळणारा रहाणे दोन्ही डावांत फ्लॉप ठरला होता. यानंतर त्याला संघातून वगळण्यात आले होते. आता रहाणेने अर्धशतकासह टीम इंडियासाठी शानदार पुनरागमन केले आहे. त्याने 129 चेंडूत 89 धावा केल्या.

क्षेत्ररक्षणातही शतक पूर्ण करणाऱ्या रहाणेने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सचा झेल घेतला आणि कसोटी क्रिकेटमध्ये झेल घेण्याचे शतक पूर्ण केले.

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद 469 धावांची खेळी केली. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या भारताने सर्वबाद 296 धावा केल्या. यामुळे ऑस्ट्रेलियाकडे 173 धावांची आघाडी मिळाली असून कमी धावांवर रोखण्याचं भारताला आव्हान आहे.