
टीम इंडियाने विराट कोहली, मोहम्मद शमी, केएल राहुल यासारख्या अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत रोहित शर्मा याच्या नेतृत्वात इंग्लंडला पाणी पाजलं. टीम इंडियाने चौथा कसोटी सामना हा 5 विकेट्सने जिंकत मालिका 3-1 ने लॉक केली. यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल आणि ध्रुव जुरेल या युवा त्रिकुटाने जबरदस्त कामगिरी केली. या तिघांच्या कामगिरीच्या जोरावर भारताने चौथ्या सामन्यात विजय मिळवला. या तिघांना आता आयसीसीने रिटर्न गिफ्ट दिलंय.

ध्रुव जुरेल याने चौथ्या सामन्यात टीम इंडियासाठी तारणहाराची भूमिका बजावली. ध्रुवने पहिल्या डावात 90 धावांची खेळी करत टीम इंडियाचा डाव सावरला. तर दुसऱ्या डावात नाबाद 39 धावांची विजयी खेळी साकारली.

यशस्वी जयस्वाल यानेही दोन्ही डावात निर्णायक भूमिका बजावली. जिथे इतर फलंदाज कमी पडले, तिथे यशस्वीने टिच्चून मारा केला. यशस्वीने दोन्ही डावात अनुक्रमे 73 आणि 37 अशा धावा केल्या.

शुबमन गिल या मालिकेत सातत्य राखण्यात अपयशी ठरतोय. मात्र तो संकटमोचकाच्या भूमिकेत आहे. शुबमनने जेव्हा जेव्हा टीम इंडियाला गरज होती, तेव्हा तेव्हा निर्णायक भूमिका बजावली. शुबमनने पहिल्या डावात 38 धावा केल्या. तर दुसऱ्या आणि सामन्याच्या चौथ्या डावात टीम इंडियाची 192 धावांचा पाठलाग करताना घसरगुंडी झालेली असताना ध्रुव जुरेलसोबत विजयी भागीदारी केली. शुबमनने दुसऱ्या डावात नाबाद 52 धावांची खेळी केली.

शुबमन, ध्रुव आणि यशस्वी या तिघांच्या कामगिरीची आयसीसीने दखल घेतलीय. आयसीसीने जाहीर केलेल्या टेस्ट बॅटिंग रँकिंगमध्ये टीम इंडियाच्या या त्रिकुटाला रिटर्न गिफ्ट दिलंय. या तिघांची कसोटी रँकिंगमध्ये ही कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.

यशस्वी जयस्वाल याने 3 स्थानांची झेप घेतली आहे. यशस्वीने 15 व्या क्रमांकावरुन 12 व्या स्थानी पोहचला आहे. यशस्वीच्या नावावर आता 727 रेटिंग्स आहेत.

शुबमन गिलला 4 स्थानांचा फायदा झालाय. शुबमनने 35 वरुन 31 व्या क्रमांकावर उडी घेतली आहे. शुबमनच्या नावावर 616 रेटिंग्स आहेत.

तर 2 कसोटी सामने खेळलेल्या ध्रुव जुरेलने इतिहास रचला आहे. ध्रुव जुरेलने थेट 31 स्थानांची लाँग जंप घेतलीय. ध्रुव 100 व्या स्थानावरुन थेट 69 व्या क्रमांकावर पोहचला आहे.